मुंबई - कॉमेडियन सुनील पाल यांच्या अपहरणाच्या धक्कादायक प्रकरणानंतर, 'वेलकम' अभिनेता मुश्ताक खान यांच्या अपहरणाबद्दलची माहिती समोर आली आहे. मुश्ताक खान यांचा बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी एका मुलाखतीत एक खुलासा केला आहे की, "20 नोव्हेंबरला मेरठमध्ये मुश्ताकला एका अवॉर्ड शोमध्ये बोलावण्यात आलं होतं. यासाठी त्यांना पैसे देखील देण्यात आले होते. याशिवाय त्यांच्यासाठी विमानाची तिकिटेही पाठवले गेले होते. यानंतर ते दिल्लीत गेले, तेव्हा त्यांना कारमध्ये बसण्यास सांगण्यात आलं. मुश्ताक यांना मेरठला जाण्याऐवजी दिल्लीच्या सीमेवर असलेल्या बिजनौरजवळ एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं."
मुश्ताक खान झालं होतं अपहरण : यानंतर शिवम यांनी पुढं सांगितलं, "अपहरणकर्त्यांनी त्यांना सुमारे 12 तास ओलीस ठेवलं होतं. याशिवाय त्यांच्यावर अत्याचार करून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मुश्ताक यांच्या मुलाच्या खात्यातून 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली गेली. ती रात्र मुश्ताकसाठी खूप भयानक होती. यानंतर त्यांना पहाटे अजान ऐकू आली, तेव्हा जवळच एखादी मस्जिद असेल असं त्यांना वाटलं. यानंतर त्यांनी तेथून पळ काढला आणि तेथील लोकांची मदत घेतली. पोलिसांच्या मदतीनं ते घरी परतले. मुश्ताक सर आणि त्यांचे कुटुंब त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेनं पूर्णपणे घाबरले आहे. यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करणार असल्याचा विचार केला, मात्र ते सध्या गोंधळात आहे. यानंतर मी बिजनौरला जाऊन एफआयआर दाखल केली."
पोलिसांचा तपास सुरू : शिवम यांनी पुढं म्हटलं, "आमच्याकडे विमानाची तिकिटे, बँक खाती आणि विमानतळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे आहेत. याशिवाय ते आता आजूबाजूच्या लोकांना देखील ओळखत असून त्यांना कुठे कैद केलं होत, यांची देखील माहिती आहे. पोलिसांचे पथक लवकरच गुन्हेगारांना पकडेल, असं मला वाटते." सध्या याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच मुश्ताक खान सध्या ठिक असून ते लवकरच मीडियाला या घटनेबद्दल माहिती देईल. आता या घटनेनंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांना धक्का पोहचला आहे.