मुंबई - Animal Welfare Board of India : महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आंदोलनाच्या माध्यमातून विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. लोकशाहीच्या माध्यमातून अनेकजण आपलं म्हणणं सरकारकडे पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत असतात. निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार प्रवीण कुमार मोहारे यांनी 'चित्रा' चित्रपटांमधील एका दृश्याप्रमाणं झाडावर चढून आंदोलन केलं. दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील झाडावर बसून मोहारे यांनी आंदोलन केल्यानं ते चर्चेत आले आहेत.
निर्माता प्रवीण कुमार मोहारे आंदोलन : बुधवारी शिवाजी पार्क परिसरातील एका झाडावर प्रवीण कुमार मोहारे बसून आंदोलन करत होते. चित्रपटात पशुपक्षी आणि प्राण्यांच्या सीनसाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून एनओसीसाठी तीस हजार मागण्यात येत आहेत, असा आरोप प्रवीण कुमार मोहारे यांनी केला. यावेळी परिसरामध्ये काहीजणांनी गर्दी केली होती. घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दल आणि पोलिसांनी प्रवीण यांना खाली उतरवले. यानंतर त्यांना शिवाजी पार्क पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे.
सेन्सर बोर्डच्या अटी : यावेळी त्यांनी म्हटलं, "नुकताच मी 'शिरच्छेद प्रेमाचा' हा चित्रपट बनवला आहे. सदर चित्रपट प्रदर्शनासाठी पेंडिंग आहे. याच मूळ कारण म्हणजे सेन्सर बोर्ड आहे. याशिवाय ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या जाचक अटी आहेत. चित्रपटात एक कोंबडी जरी दाखवली तर सीन पास करण्यासाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्डाला तीस हजार रुपये दयावे लागतात. चित्रपटात बैलगाडी जर दाखवायची असेल तर तुम्हा पहिले 30 हजार भरावे लागतात. अशा प्रकारचं ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच नियम आहेत. दररोज लाखो कोंबड्या बकऱ्या कापल्या जातात, हे सरकारला दिसत नाही, मात्र एक निर्माता चित्रपटांमध्ये कोंबडी बैल, गाई दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो अन्याय आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बॉलिवूडमधील काही अश्लील चित्रपट दाखवले जात आहेत. हे योग्य आहे का ? फिल्म सेन्सर बोर्डानं ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या अन्यायकारक अटीदेखील काढून टाकाव्यात," अशी त्यांनी मागणी केली आहे. याआधी साऊथ अभिनेता विशालनं देखील सेन्सॉर बोर्डाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील काही गोष्टी शेअर केल्या होत्या. विशालनं यापूर्वी दावा केला होता, सेन्सॉर बोर्डानं त्याच्या चित्रपटाला प्रमाणित करण्यासाठी 6.5 लाख रुपयांची लाच मागितली होती.