मुंबई - महाराष्ट्रीतील राजकारण तापलं असताना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याची चर्चाही सुरू झाली आहे. राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा मात्र एका वेगळ्या कारणासाठी सुरू आहे. त्यांच्याकडे आगामी चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली असल्याचं स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे.
अलिकडेच एका प्रसिद्ध वाहिनीवर संभाजीराजे छत्रपती यांची मुलाखत झाली. यामध्ये त्यांनी आपल्याला चित्रपटात भूमिका करण्यासाठी विचारणा झाल्याचं सांगितलं होतं. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "परवाच मला नागराज मंजुळेंचा फोन आला, त्यांनी सांगितलं की ते खाशाबा जाधव यांच्यावर चित्रपट बनवत आहेत. खाशाबा जाधव यांना त्यावेळी आमचे आजोबा शहाजी महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. मंजुळे यांची इच्छा आहे की शहाजी महाराजांचा रोल मी करावा. कारण त्यांना वाटतं की मी बराचसा शहाजी महाराजांसारखा दिसतो. त्यामुळे या भूमिकेत मी योग्य दिसेन. नागराज मंजुळे यांच्या इच्छेला मान देऊन ही भूमिका मी स्वीकारली आहे."
खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनतोय ही गोष्ट सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. १९५२ च्या हेलंसिकी ऑलम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदा कास्यपदक खाशाबा जाधव यांनी मिळवून दिलं. खाशाबा जाधव यांनी जागतिक कीर्तीच्या कुस्तीत आपलं नाव कोरलं. देशाला नावलौकिक मिळवून दिला होता. त्यांची कारकीर्द नेमकी कशी होती ती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. यासाठी नागराज मंजुळे यांनी खूप अभ्यास करुन या चित्रपटाची निर्मिती सुरू केली आहे.
नागराज मंजुळे हे नेहमीच वेगळ्या धाटणीचा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांचा मागचा चित्रपट बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. झोपडपट्टी वस्तीतील मुलांना जागतिक दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या कोचची भूमिका झुंड या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला देखील भरभरून प्रतिसाद दिला होता. याव्यतिरिक्त नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेले सर्वच चित्रपट हिट ठरले आहेत.
हेही वाचा -