मुंबई - Money Laundering Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या 98 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केल्याची बातमी आता समोर येत आहे. आता याबद्दल ईडीनं सोशल मीडियावर ट्विट करून माहिती दिली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार, राज कुंद्राची 98 कोटी रुपयांची मालमत्तेमध्ये राज कुंद्रा आणि शिल्पाचे इक्विटी शेअर्स, जुहू फ्लॅट आणि पुण्यातील बंगल्याचा देखील समावेश आहे.
राज कुंद्रा सापडला अडचणीत : महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी मेसर्स व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड दिवंगत अमित भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिंपी भारद्वाज, अजय भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि अनेक एमएलएम एजेंट यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू केला होता. बिटकॉइन घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग संदर्भात 2018 मध्ये ईडीनं राज कुंद्राची चौकशी केली होती. खोटे आश्वासन देऊन भोळ्या लोकांकडून बिटकॉइनच्या रूपात पैसे घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण बिटकॉइनच्या वापराद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याशी संबंधित आहे.
राज कुंद्रानं केली फसवणूक : राज कुंद्रानं युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म सुरू करण्यासाठी अमित भारद्वाजकडून 285 बिटकॉइन्स घेतल्याचे ईडीच्या तपासात उघड झालं आहे. राज कुंद्राला 19 जुलै 2021 रोजी इतर 11 लोकांसह अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. आता सध्या राज कुंद्राशिवाय आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज अजूनही फरार आहेत. यापूर्वी ईडीनं 69 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. आता अनेकजण राज कुंद्राला ठग असल्याचं म्हणत आहे. सोशल मीडियावर अनेकजण राज कुंद्रामुळे शिल्पाला खडे बोल सुनावत आहेत. गेल्या वर्षी राज कुंद्रानं 'युटी69' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याचा हा चित्रपट खूप चर्चेत होता. या चित्रपटामध्ये त्यानं जेलमध्ये घालवलेल्या दिवसांबद्दल दाखविण्यात आलं होत.
हेही वाचा :