मुंबई - Priyanka Chopra : गेली कित्येक शतके स्त्रियांना समानतेची वागणूक आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक जण कार्यरत आहेत. अर्थात त्यात स्त्रियांची संख्या अधिक आहे. परंतु महिलांच्या लैंगिक समस्यांवर फार कमी बोलले गेले आहे. तसेच त्यांच्यावरील लैंगिक छळाबद्दल कोणीही बोलताना दिसत नसे. किंबहुना आधीच्या काळात त्याविषयी बोलणेदेखील पाप समजले जाई. परंतु भारतीय समाजानेसुद्धा कात टाकली असून या विषयावर चर्चा होताना दिसतात, खासकरून शहरी भागात. प्रियांका चोप्रा जोनास हिने आपली निर्मितीसंस्था पर्पल पेबल्स पिक्चर्स मार्फत 'वुमन ऑफ माय बिलियन' अर्थात 'WOMB' या डॉक्युमेंटरीची निर्मिती केली असून ती एका महिलेच्या भारतभर केलेल्या प्रवासाची कहाणी असून त्यातून महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत या हिंसेला सामोरे गेलेल्या महिलांना भेटण्यासाठी एका महिलेच्या प्रवासाची सत्यकथा सांगणारा हा माहितीपट असून त्याला प्रियांका चोप्राने पाठिंबा दर्शविला आहे. अजितेश शर्मा यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.
"महिलांवर होत आलेले लैंगिक अत्याचार, भेदभाव आणि मुस्कटदाबी याविरुद्ध संघर्ष नाही तर त्यापलीकडे घेऊन जाणारा हा माहितीपट आहे. यात वेदना आणि दुःख यांचा सहानुभूतीपर वापर न करता स्त्रियांचे सामाजिक उत्थान कसे होईल आणि जागतिक स्तरावर त्यांना सन्मान कसा मिळेल यावर भाष्य करण्यात आलेले आहे", अशा भावना प्रियांका चोप्रा जोनास हिने व्यक्त केल्या.
सृष्टी बक्षी, जी युनायटेड नेशन वुमेन चँपियन ऑफ चेंज (UN Women Champion of Change) आहे, या महिलेने तब्बल २४० दिवस भारतात प्रवास करून अनेक ठिकाणे पिंजून काढली. अनेक महिलांना धीर देत बोलते केले तसेच तिने केलेल्या साधारण ३८०० किमीचा प्रवास आणि त्यातील अनुभव म्हणजे ही डॉक्युमेंटरी, 'वुमन ऑफ माय बिलियन'. या माहितीपटात प्रज्ञा प्रसून देखील आहे, जिने आपले आयुष्य विविध स्वरूपातील हिंसाचाराला सामोरे गेलेल्या महिलांचे पुनर्वसन करण्यात घालवले आहे.
प्रियांका चोप्रा जोनासची निर्मिती असलेली 'वुमन ऑफ माय बिलियन' (WOMB) मे महिन्यात प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
हेही वाचा -
- "मला वाद घालायचा नाही", म्हणत अरबाज खाननं दिलं मलायका अरोराला उत्तर - Arbaaz Khan on Malaika Arora
- कृष्णा अभिषेकशी असलेल्या वादानंतरही गोविंदानं आरती सिंगच्या लग्नाला लावली हजेरी - Krushna Abhishek
- फरदीन खानला 24 वर्षापूर्वी भन्साळी यांनी दिला होता नकार, त्यानंच सांगितला हा भन्नाट किस्सा - Fardeen Khan