मुंबई - Mass resignation in AMMA : हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांवर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. अभिनेता मोहनलाल यांनी मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचं अध्यक्षपद सोडलं असून यांच्यासह अन्य सदस्यांनीही आता राजीनामे दिले आहेत. आता ही समिती बरखास्त करण्यात आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीत आघाडीच्या व्यक्तींविरुद्ध झालेल्या लैंगिक छळाच्या गंभीर आरोपांनंतर ही समिती संकटात सापडली. 'अम्मा'चे अध्यक्ष मोहनलाल यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केल्यानंतर आता सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
'अम्मा'मध्ये सामूहिक राजीनामा : आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संस्थेचं प्रशासकीय मंडळ यापूर्वीच बरखास्त करण्यात आलं होतं. संस्थेचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सध्याच्या नियामक मंडळाचे सदस्यांमार्फत आवश्यक व्यवहार सुरू राहतील. हेमा समितीच्या अहवालात आरोपींबाबत काहीही न बोलल्यानं अभिनेता शम्मी थिलकननं मोहनलाल यांच्या मौनावर निशाणा साधला. त्यांनी पत्रकारांबरोबर बोलताना, मोहनलाल यांनी प्रतिक्रिया देण्याची क्षमता गमावली असल्याचं झोंबणारं वक्तव्य केलं. यानंतर अनेकांनी मोहनलाल यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर त्यांनी लगेच मल्याळम मूव्ही आर्टिस्टच्या असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
केरळ सरकारनं घेतला मोठा निर्णय : अध्यक्ष मोहनलाल आणि त्यांच्या 17 सदस्यीय समितीनं नैतिक जबाबदारीचं कारण देत आपल्या पदांचा राजीनामा दिला. हेमा समितीच्या स्फोटक अहवालात असोसिएशननं त्यांच्या निर्णयाबाबत एक निवेदन पोस्ट केलं आहे. लवकरच नवीन नियामक मंडळाची निवड करण्यात येणार असल्याचं यामध्ये सांगितलं गेलं आहे. असोसिएशनच्या निवेदनात म्हटलं आहे की - आम्हाला आशा आहे की 'अम्मा'(AMMA)कडे एक नवीन नेतृत्व असेल, जे असोसिएशनचं नूतनीकरण आणि मजबूतीकरणासाठी सक्षम असेल. दरम्यान, नवीन नियामक मंडळाच्या निवडीसाठी दोन महिन्यांत सभेची बैठक बोलावण्यात येईल अशी माहितीही असोसिएशननं दिली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांबाबत केरळ सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबर बैठक बोलावून महिला कलाकारांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी सात सदस्यीय विशेष पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.