मुंबई - किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' चित्रपटाची ऑस्कर 2025 साठी भारतीय फिल्म फेडरेशनने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीत अधिकृत प्रवेश म्हणून निवड केल्याचं जाहीर केलंय. याबद्दल चित्रपटाची निर्माती आणि दिगदर्शिका किरण राव हिनं कृतज्ञता व्यक्त केली आहे. या वर्षी उत्तम भारतीय चित्रपट बनले असताना तिच्या चित्रपटाची वर्णी ऑस्करसाठी लागली हा एक बहुमान असल्याचं किरणनं म्हटलंय.
"आमचा 'लापता लेडीज' हा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी भारताचा अधिकृत चित्रपट म्हणून निवडला गेला याचा मला खूप आनंद झाला आहे. आमच्या अविरत आणि कठोर श्रमाचं हे फलीत असल्याचा दाखला आम्हाला मिळालाय. संपूर्ण टीमचं समर्पण आणि उत्कटतेनं ही कथा जिवंत झाली," असं किरण हिनं निवेदनात म्हटलं आहे.
आपल्या निवेदनात पुढं म्हणाली, "सिनेमा हे हृदयांना जवळ आणणारं, सीमा ओलांडणारं आणि अर्थपूर्ण संभाषणांना प्रज्वलित करणारं सशक्त माध्यम राहिलं आहे. मला आशा आहे की हा चित्रपट भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांनाही आवडेल." त्यानंतर तिनं 'निवड समिती आणि या चित्रपटावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून आभार' व्यक्त केलं.
अॅनिमल, किल, कल्की 2898 एडी, श्रीकांत, चंदू चॅम्पियन, जोराम, मैदान, सॅम बहादूर, आर्टिकल 370, मल्याळम चित्रपट अट्टम अशा दर्जेदार आशय असलेल्या 29 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड करण्यात आली. 'लापता लेडीज' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
किरण राव पुढे म्हणाली, "या वर्षी अशा अप्रतिम भारतीय चित्रपटांमधून निवड होणं हा खरोखरच मोठा बहुमान आहे. हे चित्रपटही या सन्मानासाठी तितकेच पात्र दावेदार होते." आमिर खान प्रॉडक्शन्स आणि जिओ स्टुडिओच्या पाठिंब्याबद्दल आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल तिनं आभार मानले.
"प्रतिभावान अशा प्रोफेशनल टीमबरोबर काम करणं हा एक विशेषाधिकार आहे. त्यांनी मला ही कथा सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. संपूर्ण कलाकार आणि क्रू यांनी त्यांची प्रतिभा, समर्पण आणि कठोर परिश्रम पणाला लावल्याबद्दल त्यांचे आभार मानते.", असं तिनं पुढं म्हटलंय.
हेही वाचा -