मुंबई - Bhuvan bam : यूट्यूब सेन्सेशन आणि अभिनेता भुवन बामचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आता त्यानं डीपफेक व्हिडिओबद्दल चाहत्यांना देखील सतर्क केलं आहे. चाहत्यांना इशारा देताना भुवननं म्हटलं, "मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माझ्या एका डीपफेक व्हिडिओबद्दल सावध करू इच्छितो. हा व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे. सट्टेबाज लोकांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये लोकांना टेनिसमध्ये बेटिंग करण्यास सांगितलं जात आहे. भुवनच्या टीमनं डीपफेक व्हिडिओबाबत कारवाई केली असून मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांचा 'या' प्रकरणी तपास सुरू : यानंतर भुवननं पुढं म्हटलं "माझ्या टीमनं आधीच ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मी सर्वांना विनंती करतो की, या व्हिडिओला बळी पडू नका. कृपया सुरक्षित राहा, यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं, अशी कोणतीही गुंतवणूक करणे टाळा. सावध राहाणे आणि या फसवणूक करणाऱ्यांच्या फंदात न पडणे अत्यंत आवश्यक आहे." दरम्यान गुजरातमध्ये जन्मलेल्या भुवन बामचं खरं नाव 'भुवन अवनीनंद्र शंकर बाम' आहे. कॉमेडियन असण्याबरोबर तो लेखक, गायक आणि अभिनेता देखील आहे. काश्मीरच्या पुरात आपला मुलगा गमावलेल्या महिलेला असंवेदनशील प्रश्न विचारणाऱ्या एका वृत्तनिवेदकाची खिल्ली उडवणाऱ्या व्हिडिओद्वारे त्यानं आपल्या इंटरनेट करिअरची सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आहे.
भुवन बामचं करिअर : पहिल्या व्हिडिओवरून भुवनच्या मनात यूट्यूबर बनण्याची कल्पना आली आणि त्यानं 2015 मध्ये स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार केलं. 2016 मध्ये त्याचा पहिला म्यूझिक व्हिडिओ 'तेरी मेरी कहानी' रिलीज झाला होता. 'संग हूँ तेरे', 'सफर', 'रहगुजर', 'अजनबी' यांसारख्या गाण्यांमधून तो लोकांमध्ये लोकप्रिय झाला. 2018 मध्ये त्यानं यूट्यूबवर 'टीटू टॉक्स' नावाची नवीन डिजिटल मालिका सुरू केली. यामध्ये शाहरुख खान त्याचा पहिला पाहुणा होता. यानंतर, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि एसएस राजामौली सारखे स्टार्स पाहुणे म्हणून दिसले. 'टीटू टॉक्स'ला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानं 2023 मध्ये 'ताजा खबर' मधून ओटीटीवर पदार्पण केलं आणि याशिवाय तो ॲमेजन मिनी टीवीवर 'रफ्ता रफ्ता'मध्ये देखील दिसला आहे.