मुंबई - Aryan Khan Case : ईडीनं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात वाचवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्या वर्षीही सीबीआयनं या प्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला होता. यानंतर याप्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. समीर वानखेडेवर ईडीनं कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
ईडीनं केली मोठी कारवाई : ईडीनं समीर वानखेडेविरोधात सेंट्रल मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेन्शन ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत गुन्हा दाखल केला. यासोबतच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या काही अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेनं शाहरुख खानकडे मुलाच्या सुटकेच्या बदल्यात 25 कोटी रुपयांची लाच मागितली होती. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समीर वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता. त्याचवेळी या क्रूझवर शाहरुख खानचा मुलगाही उपस्थित होता. या छाप्यात समीर आणि त्याच्या टीमनं या क्रूझमधून आर्यन खानसह 9 जणांना अटक केली. या प्रकरणात आर्यन खानला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये 20 दिवस सर्वसामान्य कैद्यांमध्ये ठेवले होते.
काय होतं प्रकरण? : आर्यनवर ड्रग्ज डिलींग रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप होता. यानंतर वर्षी 27 मे 2022 रोजी आर्यन खानला या प्रकरणात क्लीन चिट दिली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान समीर वानखेडे यांच्या पथकानं फोन जप्त करून जबाब घेण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे केली नसल्याचं देखील समोर आलं होत. समीर वानखेडेनं प्रसिद्ध होण्यासाठी हे प्रकरण वाढवलं असल्याचं अनेकांनी आरोप केले होते. आर्यन खानबद्दलची बातमी खूप मोठी असल्यानं याप्रकरणात अनेकांना यानंतर अटक केली गेली होती. आता याप्रकरणाची आणखी सखोल चौकशी सुरू आहे.
हेही वाचा :