मुंबई - भारताचे महान उद्योजक रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी बुधवारी निधन झालं. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. टाटा यांच्या निधनानंतर देशातील सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय सिनेसृष्टीतील तमाम स्टार्सनीही शोक व्यक्त केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
अमिताभ बच्चन यांनीही रतन टाटा यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करण्यापूर्वी त्यांना ट्रोल केले जात होते आणि आता त्यांच्या पोस्टवर कमेंटचा पूर आला आहे.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी एक निवेदन जारी केलंय. यामध्ये लिहिण्यात आलंय की, 'आम्हाला रतन नवल टाटा यांना निरोप देताना मोठं दुःख होत असून, कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. एक असामान्य नेता ज्यांच्या अतुलनीय योगदानाने केवळ टाटा समूहालाच आकार दिला नाही, तर आपल्या राष्ट्राच्या जडणघडणीतही हातभार लावला. टाटा समूहासाठी रतन टाटा हे चेअरपर्सनपेक्षा मोठे होते. माझ्यासाठी ते गुरू, मार्गदर्शक आणि मित्रही होते", अशा भावनाही एन चंद्रशेखर यांनी व्यक्त केल्या.
रतन टाटा यांचं सामाजिक कार्य लक्षात घेता भारत सरकारने त्यांना 2000 साली पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवलं होतंरतन टाटा यांच्या निधनाने देशातील तरुण उद्योजकांनी एक मोठा खंबीर आधार गमावलाय. त्यांनी वैयक्तिक क्षमतेनुसार अनेक स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवले होते. त्यांनी लेन्सकार्ट, अर्बन कंपनी, फर्स्टक्राय, ओला, ओला इलेक्ट्रिक, अपस्टॉक्स, कार देखो अशा 45 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली होती. टाटा यांच्या याच तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या सवयीमुळे अनेक तरुण आपल्या नवनवीन कल्पनांसह उद्योग क्षेत्रात उतरले आहेत आणि यशाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत.