मुंबई - ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये सहभागी होत असलेल्या सेलेब्रिटीमध्ये मराठमोळी अभिनेत्री छाया कदमचाही समावेश आहे. ती कानला निघण्यापूर्वी मुंबई विमानतळावर दिसली. तिनं हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन 'चलो कान'चा नारा दिला आहे. छाया कदमचा पोस्ट पाहून तिच्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. अनेकांनी तिला यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अलिकडेच तिचा 'लापता लेडीज' हा हिंदी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर यातील छाया कदमच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. त्याआधी तिच्या 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपटालाही उत्तम यश मिळालं होतं.
14 मेपासून सुरू झालेल्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ 2024 येत्या 5 मेपर्यंत चालणार आहे. या फेस्टिव्हलला जगभरातील अनेक दिग्गज सेलेब्रिटी हजर राहणार आहेत. बॉलीवूडमधील अनेक कलाकार ‘कान फेस्टिव्हल’साठी यापूर्वीच रवाना झाले आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लेक आराध्या बच्चनसह रवाना झाली. त्यापूर्वी कियारा अडवाणी मुंबई विमातळावर स्पॉट झाली होती. त्यामुळेर मराठमोळी अभिनेत्री छाया कदमही सहभागी होत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये कौतुक आहे.
छाया कदम यांच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमिर खानची माजी पत्नी आणि लापता लेडीजची दिग्दर्शिक किरण राव हिनंही छाया कदमला शुभेच्छा दिल्या आहेत. ख्यातनाम राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक रवी जाधव यांनीही "Wah!!! Kadkad Chandrakka," असं प्रतिक्रिया देताना लिहिलंय.
अलिकडेच लापता लेडीजला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर तिनं अलिकडेच एक सुंदर पोस्ट लिहिली होती. छाया कदमने किरण राव आणि आमिर खान यांच्या बरोबरचा एक फोटो शेअर करुन एक सुंदर पोस्ट लिहिली होती. यामध्ये तिनं लिहिलंय, "खरतर लापता काहीच होत नसते. आपण फक्त ते नव्याने पुन्हा शोधायचे असते. मग ती एखादी वस्तू असो की माणसं असो किंवा जगणं. ताकदीने आणि मन लावून शोधले की सापडतेच. मलाही सापडलेच की, ज्यांना नेहमी भेटायची खूप मनापासून इच्छा होती ती सुंदर आणि निर्मळ मनाची माणसं. अर्थात लापता लेडीजच्या निमित्ताने माझ्या वाट्याला आयुष्यभराच्या सुखासारखे आलेले आमीर खान आणि किरण राव.
आज सिनेमा प्रदर्शित होतो आहे. पण या सिनेमा निमित्त माझी आणि आमीर जी व किरण जी यांच्या सोबत झालेली पहिली भेट मी कधीच विसरू शकत नाही. कारण त्या भेटीत फॅन्ड्री - गीता आणि बाळासाहेब ठाकरे या तीन विषयांवर आमच्या खूप गप्पा झाल्या होत्या. आणि यातूनच कळते की, ही माणसे इतकी वेगळी का आहेत ते.
सिनेमाच्या सगळ्या प्रोसेस मध्ये काम करत असताना, हळू हळू जसा एक एक सीन पुढे पुढे जात होता, तशी तशी ही माणसं मला हळू हळू कळत गेली, त्यांच माणसांना जोडण - माणसांना जपणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं. आणि याच सगळ्यात मग कधी ही माझी हक्काची माणसं झाली ते कळलेच नाही.
खूप छान आणि सरळ सोप्या कथेचा इतका सुंदर आणि तरल सिनेमा बनवावा तर, तो आमीर जी आणि किरण जी यांनीच. लव्ह यू आमीर जी आणि किरण जी.
आज पासून प्रदर्शित होतोय सिनेमागृहात ‘लापता लेडीज’. नक्की पहा. कदाचित सिनेमा पाहताना तुमचे ही काहीतरी हरवलेले, तुम्ही पुन्हा नव्याने शोधायला सुरवात कराल.
नक्की पहा ‘लापता लेडीज’."
हेही वाचा -
- जान्हवी-राजकुमार यांनी 'मिस्टर आणि मिसेस माही'तील 'देखा तेनू' गाण्यावर दिली पहिली प्रतिक्रिया - Mr and Mrs Mahi
- विजयकांतना मरणोत्तर 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर रजनीकांत झाला भावूक - Rajinikanth
- अनसूया भारद्वाजच्या वाढदिवसानिमित्त 'पुष्पा 2'मधील फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - anasuya bharadwaj first look poster