पुणे Nana Patekar On Politics : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे राजकारणात येणार असल्याच्या नेहमीच चर्चा सुरू असतात. कधी नाना पाटेकर लोकसभा लढवणार, तर कधी ते अमूक पक्षात जाणार अशी चर्चा होते. "आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही," असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलंय. शनिवारी (21 सप्टेंबर) पुण्यात नाम फाऊंडेशनचा नववा वर्धापन दिन पार पडला. या कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजकारणात येण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर? : नाम फाऊंडेशनचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नाना पटोले आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमाशी संवाद साधला. नाना पाटेकर हे खडकवासला मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात विचारण्यात आलं असता नाना म्हणाले की,"राजकारण हा माझा पिंड नाही. मी आयुष्यात कधीही राजकारणात जाणार नाही. राजकारण्यांशी मैत्री करा. पण कुणाशी मैत्री करायची, कुणाशी नाही, हेही कळायला हवं. सर्वच राजकारणी वाईट आहेत, असं नाही. सर्वच चांगले आहेत, असंही नाही."
...त्यामुळं मी राजकारणात जात नाही : पुढं ते म्हणाले, "राजकारणात मी जात नाही. याचं कारण म्हणजे जर मला काही पटलं नाही तर मी बोलतो. बेधडक बोलण्याच्या माझ्या या सवयीमुळं मला कोणीही त्यांच्या पक्षातून काढून टाकतील. इथं तुम्ही गप्प राहिलं पाहिजे. मात्र, तेच मला जमत नाही."
स्वामिनाथन आयोग लागू करा : यावेळी नाना पाटेकर यांनी मोदी सरकारला स्वामिनाथन आयोगाची शिफारस लागू करण्याची विनंती केली. तसंच स्वामिनाथन आयोग लागू झाल्यास कलाकारांसाठी हा मोठा सन्मान असेल असंही ते म्हणाले. नाम फाऊंडेशनच्या कामांसंदर्भात ते म्हणाले, "नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून या नऊ वर्षात 1 हजार 32 गावांमध्ये 9.47 टीएमसी एवढं पाण्याचं काम झालंय. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 15 हजारवरून ती मदत 25 हजार करण्यात आली आहे." तसंच विविध राज्यात देखील काम सुरू झालं असल्याचं यावेळी नाना पाटेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -