मुंबई - भारतात सर्वत्र दिपावली सणाची धामधूम सुरू झाली आहे. सामान्य माणसापासून ते पैसेवाल्यांपर्यंत प्रत्येकजण या आनंदाच्या सणात स्वतःला गुंतवत आहे. बॉलिवूड सेलेब्रिटीही यात मागे नाहीत. दिवाळीच्या निमित्तानं या सेलेब्रिटींची घरं दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघाली आहेत. शाहरुख खान आणि गौरी खान यांचे प्रतिष्ठित निवासस्थान असलेला मन्नत बंगलाही दिवाळीच्या दिव्यांनी प्रकाशमय झाला आहे.
शाहरुख खानचं कुटुंब प्रत्येक सणाचा आनंद घेत असतं. दिवाळीच्या उत्सवानिमित्तानं या जोडप्यानं आपल्या घराची सजावट केली असून मिठाई, कैटुंबीक मेलावे यासाठी मन्नत बंगला सज्ज झाला आहे. येत्या काही दिवशात याच बंगल्यात अनेक आनंदाचे प्रसंग हे जोडपं निर्माण करेल आणि आपल्या चाहत्यांनाही आनंद देईल.
दिवाळीच्या या आनंदाच्या दिवसामध्येच शाहरुख खानचा वाढदिवस येत आहे. 2 नोव्हेंबर रोजी तो आपला 59 वा वाढदिवस साजरा करेल. याची सुरुवातच दिवळीच्या निमित्तानं झाली आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी त्याचा वाढदिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. यावेळी त्याचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला जाणार आहे. किंग खान इंडस्ट्रीतील जवळचे मित्र आणि कुटुंबियांसह वाढदिवस साजरा करणार आहे. यासाठी पाहुण्यांची यादी गौरी आणि मुलांनी बनवली आहे. शहरुख खानच्या वाढदिवसाच्या भव्य सोहळ्यासाठी सुमारे 250 लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींना शाहरुख खानच्या बर्थडे पार्टीसाठी आमंत्रीत करण्यात आलंय. यामध्ये फराह खान, सैफ अली खान, जोया अख्तर, रणवीर सिंग, आलिया भट्ट, अनन्या पांडे, करिश्मा कपूर, करण जोहर अशा लोकप्रिय तारे तारकांची उपस्थिती अपेक्षित आहे. याशिवाय शाहरुख आणि गौरीचे जवळचे मित्रही पार्टीला सहभागी होणार आहेत. शाहरुखच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त पार्टीशिवाय मोठी घोषणाही केली जाणार असल्याचं समजतंय. एका मोठ्या चित्रपटाची घोषणा यानिमित्तानं किंग खानच्या चाहत्यांना मिळू शकेल. शाहरुखची मुलं आर्यन खान आणि सुहाना सध्या कामासाठी दुबईत आहेत. दिवाळी आणि वडील शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी ते मुंबईला परतणार आहे. दरवर्षी त्याच्या वाढदिवसानिमित्त हा शाहरुख आपल्या घराबाहेर शेकडो चाहत्यांच्या भेटीसाठी मन्नतच्या गॅलरीमध्ये अभिवादन करण्यासाठी येतो. यंदाचा हा सोहळाही भव्य असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शाहरुख खानसाठी यंदाचे हे वर्ष कामाच्या आघाडीवर यशदायी ठरले. चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतलेला शाहरुख खानच्या 'पठाण' ते 'जवान' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दबदबा दाखवला. दोन्ही चित्रपटांनी कमाईचे रेकॉर्ड तोडले, पण 'डंकी'ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई केली नाही. तो आगामी काळात त्याची मुलगी सुहाना खानबरोबर 'किंग' हा चित्रपट बनवणार आहे. अलीकडेच सुहानानं झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. प्रेक्षकांना तिच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत.