अमरावती (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि सून ब्राह्मणी यांच्यासह तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) नेत्यांशी संबंधित पोस्ट करणं चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा यांना त्रासदायक ठरलं आहे. तेलुगू देसम पक्षाचे मंडल सेक्रेटरी रामलिंगम यांनी राम गोपाल वर्माच्या विरोधात तक्रार केल्यानंतर प्रकाशम जिल्ह्यात पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक शिव रामय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या तरतुदीनुसार राम गोपाल वर्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्मा यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आल्याचंही शिव रामय्या यांनी सांगितलं.
राम गोपाल वर्माने त्याच्या 'व्यूहम' चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून सोशल मीडियावर वादग्रस्त मजकूर पोस्ट केला होता. यामध्ये त्यानं काही फोटो वादग्रस्तपणे मॉर्फ केले होते, असं समजतं. यानंतर सोशल मीडियावर ही पोस्ट वादात अडकली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि घरच्यांची बदनामी यामुळे होत असल्याचा दावा करत तेलुगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली होती.
राम गेपाल वर्मा यांचा 'व्युहम' हा चित्रपट राजकीय विषयावर आधारित आहे. यामध्ये आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेसची स्थापना केली होती. याविषयावर बनलेल्या 'व्युहम' चित्रपटात चंद्राबाबू नायडूंचीही व्यक्तीरेखा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट आंध्र प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी रिलीज करण्यात आला होता. त्यापूर्वी राम गोपाल वर्मा यांनी चंद्राबाबू नायडू यांचे दिवंगत सासरे एनटीआर यांच्यावर 'लक्ष्मीज एनटीआर' हा वादग्रस्त चित्रपटही तयार केला होता.
राम गोपाल वर्मा हे तेलुगू आणि हिंदी चित्रपटाचे यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. हिंदीमध्ये त्यांनी 'शूल', 'सरकार', 'शिवा' 'रंगीला', 'कंपनी' आणि 'सत्या' सारखे लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे.