वायनाड (केरळ) Landslides In Kerala : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मुसळधार पावसामुळं भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना आज (30 जुलै) पहाटे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 2 वाजता या भागात पहिलं भूस्खलन झालं. त्यानंतर, पहाटे 4.10 च्या सुमारास जिल्ह्यात आणखी एक भूस्खलन झालं. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामला आणि नूलपुझा गावांना भूस्खलनाचा मोठा फटका बसल्याचं सांगण्यात येतंय.
93 जणांचा मृत्यू : केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सकाळी या घटनेतील मृतांची संख्या 11 होती. यातील सहा मृतदेह मेप्पडी कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये तर 5 मृतदेह खासगी वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते." तर दुपारी तीन वाजेपर्यंत या घटनेतील मृतांचा आकडा 84 वर पोहोचला होता तर 116 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली होती. सायंकाळी पाच वाजता मृतांचा आकडा हा 93 वर पोहचला आहे.
बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत : केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (KSDMA) सांगितलंय की, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची अनेक पथकं दुर्घटना झालेल्या भागात तैनात करण्यात आली आहेत. तसंच एनडीआरएफची अतिरिक्त टीम वायनाडला पाठवण्यात आलीय. केरळ सरकारच्या फेसबुकवरील पोस्टनुसार, कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन पथकांना बचाव कार्यात मदत करण्यासाठी वायनाडला जाण्याचे निर्देश देण्यात आलेत. मात्र, मुसळधार पावसामुळं बचावकार्यात अडथळे येत असल्याचं बघायला मिळतंय.
#WATCH | Kerala: Indian Air Force deploys disaster relief team to Wayanad, where a landslide occurred earlier today.
— ANI (@ANI) July 30, 2024
The landslide claimed the lives of 93 people.
(Source: PRO Defence Trivandrum) pic.twitter.com/uRYQlTs4ix
पीएम रिलीफ फंडातून ग्रॅशिया रक्कम देण्याची घोषणा : या घटनेच मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "वायनाडच्या काही भागात झालेल्या भूस्खलनामुळं मी व्यथित झालोय. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. या घटनेसंदर्भात केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधला आहे. "तेथील सद्यस्थिती पाहता केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं पंतप्रधानांनी आश्वासन दिलंय.
#WATCH | Kerala: Indian Air Force helicopters carrying out rescue operation in Chooralmala area of Wayanad where a landslide occurred earlier today claiming the lives of over 93 people. pic.twitter.com/H0iIWzhRIx
— ANI (@ANI) July 30, 2024
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "वायनाडमधील मेप्पडीजवळ झालेल्या भूस्खलनासंदर्भात मी केरळचे मुख्यमंत्री आणि वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय. मी त्यांना विनंती केली आहे की, त्यांनी सर्व एजन्सींशी समन्वय सुनिश्चित करावा. तसेच एक नियंत्रण कक्ष स्थापन करावे. मदत कार्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही मदतीबद्दल आम्हाला कळवावं. मी केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन. त्यांना वायनाडला शक्य ती सर्व मदत देण्याची विनंती करेन. मी सर्व UDF कामगारांना प्रशासनाला बचाव आणि मदत कार्यात मदत करण्याचं आवाहन करतो."
- दोन हेल्पलाइन क्रमांक जारी : वायनाड भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं एक जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केलाय. तसंच आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 8086010833 आणि 9656938689 हे दोन हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
हेही वाचा -
- नेपाळमध्ये भूस्खलन; 63 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 2 बस गेल्या नदीत वाहून, शोध कार्य सुरु - Nepal Landslide
- रुळावर दरड कोसळल्यानं 15 तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा - Konkan Railway update
- मुंबईतील घाटकोपर परिसरात भूस्खलनाची घटना; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पाहा व्हिडिओ - Landslide in Ghatkopar