हैदराबाद : जगविख्यात तबलावादक उस्ताद जाकीर हुसैन यांन अत्यवस्थ वाटत असल्यानं अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी संगीत, कलाक्षेत्रातल्या दिग्गजांसह जगभर पसरलेले त्यांचे चाहते प्रार्थना करीत होते. त्यांच्या मृत्यूनं संगीत क्षेत्रातील तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.
51 व्या ग्रॅमी पुरस्कारानं सन्मान : जगप्रसिद्ध तबलावादक 'पद्मविभूषण' उस्ताद जाकीर हुसैन अमेरिकेत वास्तव्याला होते. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथल्या नामवंत डॉक्टरांची टीम जाकीर हुसैन यांच्यावर उपचार करत होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 9 मार्च 1951 रोजी मुंबईत जन्मलेल्या उस्ताद जाकिर हुसैन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये 'पद्मभूषण' आणि 2023 मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2009 मध्ये त्यांना 51 व्या ग्रॅमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
जाकीर हुसैन यांनी चित्रपटातही केलंय काम : प्रख्यात तबलावादक अल्लारखाँ खान हे त्यांचे पिता असल्यानं लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. अल्पावधीतच म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षापासून जाकीर हुसैन यांनी देशभरात तबला वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. तालवाद्यावर जाकीर यांनी अक्षरशः हुकूमत असल्याचं जगाला दाखवून दिलं. जाकीर यांनी आपले प्राथमिक शिक्षण माहीम, मुंबई येथील सेंट मायकल हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी संगीत आणि शिक्षण दोन्ही क्षेत्रात ज्ञानाचा पाया भक्कम केला. हुसैन यांनी अँटोनिया मिनेकोला या कथ्थक नृत्यांगना आणि शिक्षिका यांच्याशी विवाह केला. त्यांना अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत. सई परांजपे दिग्दर्शित 'साज' या चित्रपटात जाकीर हुसैन यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी 'हीट अँड डस्ट'सह काही चित्रपटांमध्येही काम केले. त्यांनी भूमिका केलेला ‘मंकी मॅन’ 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता.
सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात अभूतपूर्व असे योगदान असलेले उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाची बातमी वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) December 15, 2024
त्यांच्या… pic.twitter.com/5xkOqSK5r3
सुरुवातीला मृत्यूची अफवा, त्यानंतर जाकीर यांचा मृत्यू - 'तबल्याचे जादूगार' जाकीर हुसेन यांच्या निधनाचे वृत्त सुरुवातीला माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह विविध नामवंत व्यक्तींनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिले. मात्र, ते वृत्त खोटं आणि चुकीचं असल्याचं दिसून आल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एक्स मीडियावरील पोस्ट काढून टाकली. जाकीर यांची बहीण खुर्शीद आलिया यांनी जाकीर हे जिवंत असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटलं होतं. त्यानंतर उशिरा त्यांच्या नातेवाईकांनी जाकीर यांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थेला दिली.
संगीत क्षेत्र आज स्तब्ध- प्रसिद्ध बासरीवादक पंडित मुजूमदार यांनी ईटीव्ही भारत महाराष्ट्रचे संपादक सचिन परब यांना जाकीर हुसैन यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, " मनाला खूप वेदना होत आहेत. स्वप्नातही विचार केला नव्हता. संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा तारा एवढा लवकर कसा जाऊ शकतो? त्यांच्याबरोबर कौटुंबीक संबंध आहेत. जाकीर यांचा लहान भाऊ हा माझा जिवलग मित्र आहे. जाकीर यांच्यासोबत दोन सुपरहिट अल्बम आहेत. त्यांच्याबरोबर चित्रपटातदेखील काम केलं आहे. 'मिस्टर आणि मिसेस अय्यर' आणि 'लाफिंग बुद्धा' यांचा त्यामध्ये समावेश आहे. ईश्वराकडून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. संगीत क्षेत्र आज स्तब्ध आहे. जिथे आहे तिथे जाकीर आनंदी राहोत. ते खूप दयाळू होते. त्यांच्या काही आठवणी आल्या तरी डोळ्यात पाणी येते. प्रेम, मैत्रीबरोबरच मोठ्या भावाप्रमाणं त्यांचे आशीर्वाद मिळाले. त्यांच्यासोबत पहिल्यांदाच वादन करताना वाटले की पूर्ण जन्मभर त्यांच्यासोबत वादन करत आलेलो आहे. जेवढे आपल्याला वाटते, त्यापेक्षा ते खूप मोठे होते".