नवी दिल्ली UGC NET Exam Cancelled : मंगळवारी (18 जून) झालेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा पुन्हा एकदा नव्यानं घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं परिपत्रक काढत यासंदर्भातील निर्णय जाहीर केलाय. पेपर फुटल्याचा संशय असल्यानं तसंच या परीक्षेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचं शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. तर यावरुन आता काँग्रेसनं मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. तसंच मोदी सरकारचं लीकतंत्र तरुणांसाठी घातक असल्याचंही कॉंग्रेसनं म्हटलंय.
पेपरफुटी थांबवण्याची जबाबदारी घ्या : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणालेत की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही परीक्षेवर खूप चर्चा करता. पण आता नीट परीक्षेची चर्चा कधी करणार? युजीसी नेट परीक्षा रद्द करणं हा मोदी सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे. तर लाखो विद्यार्थ्यांचा विजय आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वी नीटमध्ये कोणताही पेपर फुटला नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, बिहार, गुजरात आणि हरियाणामध्ये शिक्षण माफियांना पकडण्यात आलं. तेव्हा शिक्षणमंत्र्यांनी पेपर फुटल्याचं मान्य केलं. नीट परीक्षा कधी रद्द होईल? पंतप्रधान मोदींनी नीट परीक्षेतही त्यांच्या सरकारची हेराफेरी आणि पेपरफुटी थांबवण्याची जबाबदारी घ्यावी."
भाजपा सरकारचे लीकतंत्र आणि भ्रष्टाचार तरुणांसाठी घातक : या निर्णयानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "भाजपा सरकारचे लीकतंत्र आणि भ्रष्टाचार तरुणांसाठी घातक आहे. नीट परीक्षेत घोटाळ्याची बातमी आल्यानंतर आता 18 जून रोजी होणारी नेट परीक्षाही अनियमिततेच्या भीतीनं रद्द करण्यात आली आहे. आता जबाबदारी निश्चित होणार का? या निकृष्ट व्यवस्थेची जबाबदारी शिक्षणमंत्री घेणार का?", असा सवालही त्यांनी केलाय.
परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडं : शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा पुन्हा नेमकी कधी होईल, यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्यात आला. पेपर फुटीच्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असंही शिक्षण मंत्रालयानं सांगितलंय. याप्रकरणात जी कुणी व्यक्ती दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, 18 जून रोजी देशातील विविध शहरांमध्ये 1200 हून अधिक केंद्रावर दोन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
हेही वाचा -
- बिहारमध्ये नीटचा पेपर कसा फुटला? गेस्ट हाऊसमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच मिळाली होती उत्तरे - NEET UG Paper Leak 2024
- नीट 2024 पेपर लीक प्रकरणी एनटीएनं पुन्हा दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, "यंदा सरासरी गुणांमध्ये 45 टक्क्यांनी वाढ" - Nta On Neet Ug
- सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, केंद्र तसंच एनटीएकडून मागितलं उत्तर - NEET UG 2024