नवी दिल्ली- "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात," असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, " भारत सरकारनं बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना आश्रय दिल्यानंतर त्या नवी दिल्लीत आहेत. बांगलादेशमधील परिस्थिती काश्मीर आणि मणिपूरमधील समस्यांसारखीच आहे. जर मोदी आणि शाह मणिपूरला जाऊ शकत नसतील तर त्यांनी हिंमत दाखवावी. किमान आता त्यांनी बांगलादेशात जाऊन तेथील हिंदूंचं कल्याण करावे. तेथील उसळलेला हिंसाचार थांबवा. "जर पंतप्रधान मोदी युक्रेनमधील युद्ध थांबवू शकत असतील तर त्यांनी बांगलादेशातही अशीच पावले उचलून तेथील हिंदूंना वाचवावे."
#WATCH | Former Maharashtra CM and Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray along with his son Aaditya Thackeray met Congress national president Mallikarjun Kharge and Lok Sabha LoP Rahul Gandhi, in Delhi
— ANI (@ANI) August 7, 2024
(Source: AICC) pic.twitter.com/svRwqm0TMR
हिंसक उठाव हा सर्व राज्यकर्त्यांना धडा- "बांगलादेशातील जनतेचा हिंसक उठाव हा सर्व राज्यकर्त्यांना धडा आहे. लोकशाहीमध्ये लोकांची शक्ती श्रेष्ठ असते. सामान्य जनतेकडं दुःख सहन करण्याची मर्यादा असते. अशा घटना कुठेही आणि केव्हाही घडू शकतात. त्यामुळे सत्तेत असलेल्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. स्वत:ला देव समजू नये," असे नाव न घेता ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. पुढे ठाकरे म्हणाले," दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिले होते. त्यामुळे तेथील हिंदूंच्या हिताचे रक्षण करणं हे पंतप्रधान मोदींचेही कर्तव्य आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट- लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंनी प्रथमच दिल्लीत भेट घेतली. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले," लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटायला आलो आहे. ते संसदेच्या अधिवेशनासाठी येथे आले आहेत. आम्ही दूरध्वनीवरून नियमित संपर्कात असतो. तर महाविकास आघाडीचे नेतेही मुंबईत नेहमी भेटत असतात."
मुंबईचा शत्रू, तो माझा शत्रू - धारावी पुनर्विकास प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. अशातच अदानी प्रकल्पाच्या दोन प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, "शरद पवार मुंबईची वाट लावायला देतील, असे वाटत नाही. मुंबईचा शत्रू, तो माझा शत्रू आहे. अदानी माझे शत्रू नाहीत. मुंबईची वाट लावू देणार नाही. धारावीतील रहिवाशांना तिथेच घरे द्यावीत, अशी आमची मागणी आहे. अदानी समूह धारावीतील रहिवाशांना मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करू इच्छित आहे."
"मी मुख्यमंत्रि पदाचं स्वप्नही पाहिले नव्हते. तशी माझी इच्छाही नव्हती. पण मी जबाबदारीपासून पळून जाणारा नाही. मी जबाबदारी स्वीकारुन माझ्या क्षमतेनुसार काम करण्याचा प्रयत्न केला. मी उत्कृष्ट काम केलं आहे, असे माझ्या सहकाऱ्यांना वाटत असेल, तर त्यांना मी मुख्यमंत्री पदी हवा आहे का, हे विचारा. मी मुख्यमंत्री व्हावं का, हे जनता ठरवेल- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरे यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि इंडिया आघाडीतील इतर नेत्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचीदेखील भेट घेतली आहे.
- भाजापाची उद्धव ठाकरेंवर टीका- दुसरीकडं उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीवर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली. "उद्धव ठाकरे हे राज्यातील महिला, शेतकरी किंवा तरुणांचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीला गेले नाहीत. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले आहेत," अशी टीका शेलार यांनी केली.
हेही वाचा-