सुरत (गुजरात) Surat 6 Storey Building Collapsed : गुजरातमधील सूरत शहरात एक मोठी घटना घडलीय. परिसरातील पालिगाम येथे शनिवारी (6 जुलै) सहा मजली इमारत कोसळली आहे. या दुर्दैवी घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या ढिगाऱ्यातून 7 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. तसंच मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. रात्रीपासून एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे.
सकाळपर्यंत मृतदेहांच्या संख्येत वाढ : शनिवारी रात्री 9.10 वाजता एक मृतदेह सापडला. रात्री 11.50 वाजता दुसरा मृतदेह सापडला. आज पहाटे 4.00, 4.30 आणि 4.45 वाजता तीन पुरुषांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर पहाटे 5.10 वाजता ढिगाऱ्यातून 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. इमारत कोसळण्यामागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. मात्र, मुसळधार पावसामुळं ही जुनी झालेली इमारत कोसळल्याचं सांगितलं जातंय.
सूरतचे पोलीस आयुक्त काय म्हणाले? : या घटनेसंदर्भात बोलताना सूरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत म्हणाले की, "सदरील इमारत 2016-17 मध्ये बांधण्यात आली होती. यातील सुमारे पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते. त्यापैकी बहुतेक लोक या भागातील कारखान्यांमध्ये काम करत होते. इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच मदतकार्य सुरू करण्यात आलं. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तसंच यासाठी एनडीआरएफची टीम मेहनत घेत आहे," असं ते म्हणाले. तसंच या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. तपास अहवालाच्या आधारे दोषींवर कारवाई केली जाईल, "असं गेहलोत यांनी सांगितले.
हेही वाचा -