नवी दिल्ली Terrorist attack on passenger bus : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 33 जण जखमी झाले आहेत. एक बस शिवखोडी मंदिरापासून कटरा येथे परतत असताना दहशतवाद्यांनी त्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर बस खड्ड्यात पडली. बस जंगल परिसरात पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळं घाबरलेल्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून बस खड्ड्यात कोसळली. पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ सायंकाळी 6.15 च्या सुमारास ही घटना घडली.
10 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली : दहशतवादी हल्ल्याबाबत एसएसपी रियासी मोहिता शर्मा यांनी सांगितलं की, प्राथमिक अहवालानुसार शिवखोरीहून कटराकडं जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारामुळं बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं त्यानंतर बस खड्ड्यात पडली. या घटनेत 33 जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य पूर्ण झालं आहे. प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही.
सध्या सैन्याकडून बचावकार्य सुरू आहे. पोलीस, निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. भारतीय सैन्य, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. घटनास्थळाच्या आसपास राहणारे स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. मदतीसाठी रुग्णवाहिका दाखल झाली आहे.- रियासी मोहिता शर्मा, एसएसपी
संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीनं उभा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडिया साइट 'X' वर लिहिलं की, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिवखोडी मंदिरातून यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला अत्यंत दुःखद आहे. ही लाजिरवाणी घटना म्हणजे जम्मू-काश्मीरमधील चिंताजनक सुरक्षा परिस्थितीचं खरं चित्र आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींची लवकरात लवकर बरे होण्याची आशा करतो. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीनं उभा आहे.
ओमर अब्दुल्लांनी केलं दु:ख व्यक्त : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर लिहिलं आहे की, जम्मू-काश्मीरच्या रियासीमधून भयानक बातमी समोर आली आहे. एका बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 10 प्रवाशांचा मृत्यू झालाय. या घटनेत अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याचा मी निषेध करतो. जो भाग पूर्वी दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यात आला होता, तिथं दहशतवाद्यांनी पुनरागमन केलं आहे.
हे वाचलंत का :
- काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दोन दहशतवादी हल्ले, एका हल्ल्यात माजी सरंपच जखमी, दुसऱ्या हल्ल्यात जोडपे जखमी - terrorist attacks in Kashmir
- 26/11 हल्ला प्रकरणी उज्ज्वल निकम यांनी सत्य लपवलं; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप - Prakash Ambedkar On Ujjwal Nikam
- जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, जवानाचा मृत्यू, दुसऱ्या जवानाची प्रकृती चिंताजनक - Terrorist attack Air Force convoy