अयोध्या Ram Mandir Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरात मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठ्या संख्येनं राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. हजारो भाविक आपल्या प्रिय रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी आतूर झाले आहेत. मुंबई, दिल्ली, नागपूरसह देशभरातून भाविक दर्शनासाठी अयोध्येत दाखल झाले.
अनेक भाविकांनी ठोकला अयोध्येत मुक्काम : रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी अयोध्येत मोठी गर्दी केली आहे. भाविक अनेक दिवसांपासून अयोध्येत मुक्काम ठोकून आहेत. आपल्या रामलल्लाच्या दर्शनासाठी काही भाविक तीन दिवसांपासून अयोध्येत तळ ठोकून आहेत. यावेळी एका भाविक महिलेनं "आम्ही तीन दिवस झाले वाट पाहात आहोत. मात्र आज दर्शनाची संधी मिळाली," असं सांगितलं. तर एका भाविकानं "ही गर्दी कायम तशीच राहिली पाहिजे. भारत ही धार्मिक भूमी आहे," असं सांगितलं.
सोन्याच्या दागिन्यांनी सजली रामलल्लाची मूर्ती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झालेल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोमवारी दुपारी 12.29 वाजता अभिजित मुहुर्तावर हा सोहळा अयोध्येत पार पडला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रत्येक पूजा विधिवत पार पडली. यावेळी रामलल्लाची मूर्ती सोन्यानं मढवण्यात आली. आता रामलल्ला बाल राम म्हणून ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचं नामकरणही करण्यात आलं आहे.
अयोध्येत साजरी होत आहे दिवाळी : अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. अयोध्येत सध्या दिवाळी साजरी होत असल्याचं दिसून येत आहे. रामनगरी अयोध्या उजळून निघाली आहे. सहा महिन्यात नागरिकांना दोनदा दिवाळी साजरी करत असल्याचा भास होत आहे. राम मंदिर परिसरात तब्बल 21 हजार दिवे लावण्यात आले आहेत. तर शरयू किनारी 21 लाख दिव्यांची आरास लावण्यात आलेली आहे. त्यामुळं अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दिवाळी साजरी होत असल्याची भावना नागरिकांची झाली आहे.
हेही वाचा :