अमरावती Attack On Eenadu Office : आंध्रप्रदेशातील वायएसआरसीपी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईनाडूच्या कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर टीका केली. आगामी निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागणार असल्यानं त्यांनी माध्यम प्रतिनिधी आणि माध्यम संस्थांवर हल्ला करण्यास चिथावणी दिली, अशी टीका त्यांनी केली. वायएसआरसीपीचे आमदार कटासनी रामभूपाल रेड्डी यांच्या समर्थकांनी कर्नूल इथल्या ईनाडू कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्याचा चंद्राबाबू नायडू यांनी निषेध व्यक्त केला.
काय केली चंद्राबाबू नायडू यांनी टीका : "निवडणुका जवळ आल्यानं नागरिकांना घाबरवण्याचा हा सरकारचा डाव आहे. मात्र नागरिक अशा दहशतवादाला बळी पडणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. सरकारच्या या हिंसक कारवाया 50 दिवसात मोडून काढल्या जातील," असा हल्लाबोल चंद्राबाबू नायडू यांनी केला. याबाबत चंद्राबाबू नायडू यांनी एक्सवर एक पोस्टही शेअर केली.
भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत असल्यानं हल्ला : वायएसआरसीपीच्या जमावानं ईनाडू कार्यालयावर केलेला हल्ला असंवैधानिक आहे. माध्यम संस्थेवरील हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश आहे. भ्रष्टाचार आणि अनियमिततेचा पर्दाफाश करत असल्यानं हा हल्ला करण्यात आला आहे. पत्रकार आणि प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांवर हल्ला करणं हे अत्याचारी आहे, अशी टीका जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी केली. "वायएसआरसीपी आमदार कटासनी रामभूपाल रेड्डी यांच्या समर्थकांनी केलेला हल्ला माफ करता येणार नाही. हा हल्ला म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे. त्यामुळं या प्रकरणी कारवाई होणं गरजेचं आहे," असही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हा राज्यातील क्रूर राजवटीचा कळस : वायएसआरसीपीच्या समर्थकांनी ईनाडू कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्याचा सर्वसत्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांनीही जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारवर टीका केली. वायएसआरसीपीच्या राजवटीत अराजक वाढलं आहे. मुख्यमंत्र्यांची सेना माध्यम संस्थांना लक्ष्य करत आहे. अनंतपूरच्या सभेत त्यांनी एका छायाचित्रकाराला मारण्याचा प्रयत्न केला. कर्नूल इथल्या ईनाडूच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. निःपक्षपाती बातमीदारी करणाऱ्या ईनाडूवरील हल्ला हा राज्यातील क्रूर राजवटीचा कळस आहे, असंही यावेळी ते म्हणाले. यावेळी टीडीपी नेते गौरू वेंकट रेड्डी आणि सोमशेट्टी व्यंकटेश्वरलू यांनी कुरनूल येथील ईनाडू कार्यालयाची पाहणी केली. "हा लोकशाहीवरील डाग आहे," अशी टीका यावेळी त्यांनी केली.
हेही वाचा :
- कुर्नूल 'ईनाडू' कार्यालयावर आमदार कटासनी यांच्या समर्थकांनी केला हल्ला; पाहा व्हिडिओ
- 'तेलुगु जनता रामोजी रावांसोबत'; चंद्राबाबू नायडूंचा जगनमोहन रेड्डींवर गंभीर आरोप
- Eenadu News : आंध्र प्रदेश सरकार साक्षी वृत्तपत्राला बढती देत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेला दिल्ली हायकोर्टात ट्रान्सफर करा- सर्वोच्च न्यायालय