गुवाहाटी PM Narendra Modi Launch Projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (4 फेब्रुवारी) आसाममध्ये सुमारे 11,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. येथून त्यांनी राज्य आणि केंद्राच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण केले.
'या' प्रकल्पांची करण्यात आली पायाभरणी : कामाख्या मंदिर कॉरिडॉर (रु. 498 कोटी), गुवाहाटी येथील नवीन विमानतळ टर्मिनलपासून सहा पदरी रस्ता (358 कोटी), नेहरू स्टेडियमचे फिफा मानकांमध्ये सुधारणा (831 कोटी) आणि नवीन क्रीडा संकुल (रु. 300 कोटी) या कामांची पायाभरणी केली आहे. याशिवाय 3,250 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या एकात्मिक नवीन इमारतीची पायाभरणी मोदींनी केली. पंतप्रधान मोदींनी 578 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या प्रस्तावित करीमगंज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची आणि गुवाहाटीमध्ये 297 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या युनिटी मॉलची पायाभरणीही केली. याशिवाय 1,451 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या विश्वनाथ चारियाली ते गोहपूर या नव्याने बांधण्यात आलेल्या चौपदरी रस्त्याचं आणि 592 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या डोलाबारी ते जामुगुरी या चार पदरी रस्त्याचंही मोदींनी उद्घाटन केले.
काय म्हणाले मोदी : गुवाहाटी येथील खानापारा येथे जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या जनतेला आसामी भाषेत संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, "कामाख्या आईच्या आशीर्वादानं आज मला हे प्रकल्प आसामच्या लोकांसमोर आणण्याचं सौभाग्य मिळालं आहे. या प्रकल्पांमुळे आसामसह दक्षिण पूर्व आशियाशी ईशान्येचा संपर्क आणखी मजबूत होईल. तसंच पर्यटन क्षेत्राचा विकास होईल आणि रोजगार निर्मिती होईल."
कॉंग्रेसवर केली टीका : पुढं ते म्हणाले की, "स्वातंत्र्यानंतर बराच काळ सत्तेत असलेल्या पक्षाला ( काँग्रेस) देशातील तीर्थक्षेत्रांचे महत्त्व समजले नाही आणि आपली मुळं जपल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. भाजपाच्या दुहेरी इंजिन सरकारनं या संदर्भात पुढाकार घेतला आहे. विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे. भाजपा सरकारनं ईशान्येच्या विकासावर विशेष लक्ष दिलं आहे."
आसामसाठी सुवर्ण दिवस : यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "आजचा दिवस आसामसाठी सुवर्ण दिवस आहे. आसाममध्ये पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत अभूतपूर्व शांतता आणि समृद्धी आली आहे. दहशतवादात अडकलेल्या हजारो तरुणांनी शस्त्रे टाकली. ते मुख्य प्रवाहात परतले. ब्रह्मपुत्रा नदीवर आम्ही नऊ पूल बांधले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि दूरदर्शी मार्गदर्शनानेच हे घडू शकले."
हेही वाचा -