नवी दिल्ली Mother Jumped Yamuna With Children : पतीबरोबर झालेल्या भांडणातून महिलेनं आपल्या तीन मुलांसह यमुना नदीत उडी घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेत महिलेला वाचवण्यात यश आलं. मात्र तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. ही घटना मथुरेतील पंजाबी फेज कॉलनीत सोमवारी रात्री घडली. पूनम असं त्या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या माहिलेचं नाव आहे. अंशिका, वंशिका आणि चारू या तीन चिमुकल्यांचा या घटनेत बळी गेला आहे.
पतीबरोबर भांडण झाल्यानं महिलेनं उचललं टोकाचं पाऊल : "पूनम हिचं काही कारणांवरुन तिचा पती हरिओम याच्यासोबत मागील काही दिवसांपासून भांडण सुरू होतं. सोमवारी रात्रीही दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर पूनम तिची आठ वर्षाची चिमुकली अंशिका, सहा वर्षाची वंशिका आणि 3 वर्षाचा चारू यांना घेऊन रात्री घरातून निघून गेली. यानंतर पूनमनं मथुरेतील यमुना नदीत उडी मारली. यावेळी नागरिकांनी मोठा आरडाओरडा केल्यानं घटनास्थळावर गर्दी जमली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जीवरक्षक दलाच्या जवानांना पाचारण केलं. यात पूनमला वाचवण्यात आलं. तर तीन चिमुकल्या मुलांचा या घटनेत मृत्यू झाला," अशी माहिती शहर पोलीस अधीक्षक अरविंद कुमार यांनी दिली.
महिलेवर सुरू आहेत उपचार : यमुना नदीत उडी मारल्यानंतर जीव रक्षक दलाच्या जवानांनी पूनमला वाचवलं आहे. मात्र तीन चिमुकल्यांचा हकनाक बळी गेला आहे. यमुना नदीत चिमुकल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बचाव पथकाला पाचारण केलं. यावेळी बचाव पथकाच्या जवानांनी तीन मुलांना शोधून काढलं. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर पूनमवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :