नवी दिल्ली Delhi Fire : नवी दिल्लीच्या अलीपूर भागातील बाजारपेठेत गुरुवारी (15 फेब्रुवारी) संध्याकाळी 5 वाजता भीषण आग लागली. काही वेळातच आगीनं उग्र रूप धारण केलं. या आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. तर चार जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. अपघातात आणखी काही जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे.
अग्निशामक दलाच्या 22 गाड्या दाखल : आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सुमारे 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरूच होतं. अग्निशमन दलानं शुक्रवारी सकाळी आग आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात एक केमिकल कारखाना चालवला जात होता. ही आग प्रथम या कारखान्यात लागली आणि नंतर आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. केमिकलमुळे आग इतक्या वेगानं पसरली. यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी खबरदारी म्हणून केमिकल कारखाना रिकामा केला आहे. सध्या आगीचं कारण समजू शकलेलं नाही.
अलीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वी आग एवढी भीषण झाली होती की अलीपूरच्या बाजारपेठेतून उंच ज्वाळा दिसत होत्या. आग लागल्यानंतर धुराचे लोट काही किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते. आगीच्या घटनेनंतर आजूबाजूच्या घरांमध्ये धुराचे लोट पसरल्यानं लोक बेशुद्ध झाले. कारखान्यातून एकूण 11 जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यात 10 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. मृतदेह बीजेआरएम रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी अलीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
हे वाचलंत का :