कोलकाता Mamata Banerjee Accident : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी कारनं परतत होत्या. दरम्यान, ड्रायव्हरनं अचानक कारचे ब्रेक लावल्यानं ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. ममता यांच्या ताफ्यात अचानक दुसरी कार आल्यानं चालकाला ब्रेक लावावा लागला. यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.
गंभीर दुखापत नाही : ममता बॅनर्जी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर्धमान जिल्ह्यात गेल्या होत्या. तेथून त्या हेलिकॉप्टरनं परतणार होत्या. मात्र खराब हवामानामुळे त्यांनी वैयक्तिक वाहनानं रस्तेमार्गानं कोलकाताला जाण्याचा निर्णय घेतला. ममता बॅनर्जींची दुखापत फारशी गंभीर नसल्याचं सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षीही जखमी झाल्या होत्या : ममता बॅनर्जी गेल्या वर्षी जून महिन्यात जखमी झाल्या होत्या. खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला सिलीगुडीजवळील सेवोके एअरबेसवर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. या दरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्या डाव्या गुडघ्याला आणि नितंबाच्या सांध्यामध्ये अस्थिबंधनाला दुखापत झाली होती.
काँग्रेसनं केली विचारपूस : ममता बॅनर्जी यांचा अपघात झाल्यानंतर, अन्य पक्षाच्या नेत्यांनी त्यांची विचारपूस केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना या अपघाताची माहिती मिळताच, त्यांनी ममता बॅनर्जी लवकरात लवकर बरे व्हाव्यात, असं म्हटलंय. काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी आजच त्या पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांचा हा निर्णय 'इंडिया' आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय.
हे वाचलंत का :