बल्लारी (कर्नाटक) Crores Cash Jewellery Seized : शहरातील ब्रुसेपेट पोलिसांनी रविवारी इथं केलेल्या एका मोठ्या कारवाईत 5.60 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 2 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. कांबली बाजारातील हेमा ज्वेलरी शॉपच्या मालकाच्या घरावर छापा टाकण्यात आला हेता. तेव्हा ही कारवाई करण्यात आलीय.
कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त : या कारवाईत एकूण 5.60 कोटी रुपये रोख, 3 किलो सोने, 103 किलो चांदीचे दागिने, 21 किलो अशुद्ध चांदी जप्त करण्यात आलीय. आरोपी ज्वेलरी दुकान मालक नरेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसंच घरातून सुमारे 7 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि दागिने जप्त करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.
जप्त केलेला पैसा आणि दागिने आयकर विभागाकडे सोपवणार : याबाबत माहिती देताना एसपी रंजित कुमार बंडारु म्हणाले, "आम्ही जप्त केलेली रोकड, सोने आणि चांदी प्राप्तीकर विभागाकडे सोपवणार पैशाचा स्रोत शोधण्यासाठी चौकशी केली जाईल. त्यानंतर निश्चित माहिती उपलब्ध होईल." डीवायएसपी नंदारेड्डी आणि सीपीआय एमएन सिंधुर यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलाय.
चेन्नईतही 4 कोटी रुपये जप्त : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष निवडणूक देखरेख दलाचे अधिकारी ठिकठिकाणी वाहनांचे ऑडिट करत आहेत. त्यानुसार 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम योग्य कागदपत्रांशिवाय वाहून नेल्यास ती निवडणूक उड्डाण पथकाकडून जप्त करण्यात येतेय. तामिळनाडूतील चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांची झडती घेण्यात आली. याठिकाणी फ्लाईंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांना नेल्लई एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी डब्यात 3 संशयित व्यक्ती आढळून आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात त्यांनी विसंगत उत्तरे दिली. संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी त्यांनी सोबत आणलेल्या सहा बॅगांची झडती घेतली. त्यात सुमारे चार कोटी रुपयांची रोकड असल्याचं आढळून आले. यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून चार कोटी रुपये जप्त करुन चौकशी सुरू केली.
हेही वाचा :