रांची Hemant Soren : झारखंडमध्ये राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. ईडीनं हेमंत सोरेन यांची सुमारे 7 तास चौकशी केली आणि नंतर त्यांना सोबत नेलं. तत्पूर्वी त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
हेमंत सोरेन यांचा राजीनामा : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिला. हेमंत सोरेन यांची ईडीनं बुधवारी 7 तास चौकशी केली. चौकशीनंतर त्यांनी राजीनामा दिला. जेएमएमचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजभवनात पोहोचल्यानंतर चंपाई सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. चंपाई सोरेन यांनी 43 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सादर केलंय.
चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री : सत्ताधारी पक्षांनी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शपथविधीची वेळ मागितली आहे. राजभवनात पोहोचल्यानंतर चंपाई सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला राज्यपालांनी पाच आमदारांना राजभवनात भेटायला बोलावलं होतं. पाच आमदारांमध्ये जेएमएमचा एक, काँग्रेसचा एक, आरजेडीचा एक, जेव्हीएमचा एक आणि सीपीआय (एमएल)चा एक यांचा समावेश आहे. चंपाई सोरेन हे सरायकेलाचे आमदार आहेत. ते पाचव्यांदा आमदार झाले आहेत.
हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी : ईडी बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. सायंकाळपर्यंत चौकशी सुरू होती. सायंकाळी 5 वाजल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ हालचाली वाढल्या. प्रथम रांचीचे डीसी आणि एसएसपी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. काही वेळानं राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपीही पोहोचले. सध्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, राजभवन आणि ईडी कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दिल्लीतील निवासस्थानी छापे : ईडीनं यापूर्वी हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापे टाकले होते. मात्र तेथे सोरेन सापडले नाहीत. त्यानंतर ईडीनं त्यांची बीएमडब्ल्यू कार आणि 36 लाख रुपये जप्त केले. ईडीच्या कारवाईनंतर 30 तासांनी हेमंत सोरेन रांचीला पोहोचले. ईडीनं हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी एकामागून एक 10 समन्स बजावले होते. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी ईडीला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी वेळ दिला होता. आज (31 जानेवारी) दुपारी 1 वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. यादरम्यान ईडीनं त्यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अनेक प्रश्न विचारले. मात्र यापैकी त्यांनी अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली नसल्याचं सांगितलं जातंय.
हे वाचलंत का :