लखनऊ Hathras Stampede : हाथरस इथं भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 121 भाविकांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीवरुन आता राजकारण केलं जात आहे. या ठिकाणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट देत न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. आज सकाळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलिगढमधील पिलाखाना गावात जाऊन पीडितांची भेट घेतली. भोलेबाबाच्या सत्संगात 2 जुलैला संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत या पीडितांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निधीतून पीडितांना मदत करण्यात येईल, असं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राहुल गांधी करणार मदत : हाथरस इथं झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 121 नागरिकांचा बळी गेला असून अनेक नागरिक जखमी झाले. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलिगढमधील पिलाखाना या गावात भेट देत पीडितांशी संवाद साधला. यातील काही पीडितांनी "राहुल गांधी यांनी आमची विचारपूस केली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पीडितांना मदत करण्यात येईल, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं," असं सांगितलं.
भोले बाबाची शोधमोहीम सुरू : उत्तरप्रदेश पोलिसांनी गुरुवारी मैनपुरी इथल्या राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टचे स्वयंघोषित धर्मगुरू भोलेबाबा याची शोधमोहीम सुरू केली. मात्र पोलिसांनी भोलेबाबा याच्यावर गुन्हा दाखल न करता, सत्संगाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला. या एफआयआरमध्ये भोलेबाबाचं नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. भोलेबाबाचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र भोलेबाबा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सुनिल कुमार यांनी गुरुवारी वृत्तसंस्थेला दिली. हाथरसचे अधीक्षक राहुल मिथास यांनीही "आश्रमात भोलेबाबा आढळून आला नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत," असं सागंतिलं.
योगी आदित्यनाथांनी दिले न्यायालयीन चौकशीचे आदेश : भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन तब्बल 121 भाविकांचा मृत्यू झाल्यानं देशभर खळबळ उडाली. याप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. संतप्त झालेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. निवृत्त न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्यात आली. ही समिती दोन महिन्यात आपल्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर करेल.
हेही वाचा :
- ''पाण्यामुळं महिला घसरून पडल्या...'', सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं सत्य - Hathras Satsang Stampede
- गुप्तचर विभागात नोकरी ते धार्मिक सत्संग; कोण आहेत हे भोले बाबा? 116 जणांच्या मृत्यूनंतर काढला पळ - Hathras Stampede Incident
- हाथरस चेंगराचेंगरीनंतर 'भोलेबाबा' फरार : आत्तापर्यंत 116 भक्तांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Hathras stampede