कर्नाल Haryana Youth Trapped in Russia : युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धात रशियाच्या बाजूनं लढताना हैदराबादच्या बाजारघाट, नामपल्ली भागातील मोहम्मद अफसान (30) नावाच्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. हा तरुण नोकरीच्या शोधात रशियाला गेला होता. मात्र, तिथं नोकरीचं आमिष दाखवून त्याला रशियन सैन्यात भरती करण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता हरियाणातील कर्नाल येथील हर्ष (वय 19) नामक तरुण टुरिस्ट व्हिसावर रशियाला गेला होता. मात्र, तिथं त्याला रशियन सैन्यात भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कुटुंबीयांचं म्हणणं काय : हरियाणातील कर्नाल येथील हर्ष हा तरुण आपला पासपोर्ट स्ट्रॉंग करण्यासाठी टुरिस्ट व्हिसावर रशियाला गेला होता. पंजाबमधील काही तरुणही त्याच्यासोबत होते. पण, रशियाहून बेलारूसला जात असताना रशियन सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं. रशियन सैन्यानं त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं सैन्यात भरती केलं, ब्रेनवॉश केलं आणि युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी पाठवलं, असा आरोप हर्ष याच्या कुटुंबीयांनी केलाय. तसंच 'आमच्या मुलाला परत आणा' अशी मागणीही त्यांनी सरकारकडं केली आहे.
हरियाणाचा हर्ष रशियात अडकला : हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील हर्षला मायदेशी परतायचंय. मात्र त्यासाठी असमर्थ असल्यानं त्यानं सरकारकडं मदतीची विनंती केली आहे. याप्रकरणी हर्षच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यात आला असता त्यांनी सांगितलं की, सरकारनं आमच्या मुलाला कोणत्याही मार्गानं भारतात परत आणावं. हर्षच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, आजी आणि एक मोठा भाऊ आहे. कुटुंबाचा खर्च गावातच एका छोट्या किराणा दुकानातून चालवला जातो.
रशियन सैन्यानं घेतलं ताब्यात : यावेळी बोलत असताना हर्षचा भाऊ साहिल म्हणाला की, हर्ष रशियाला सहलीसाठी गेला होता. त्याच्याकडं अजून दोन महिन्यांचा व्हिसा बाकी होता. मात्र, एका एजंटमुळं तो बेलारूसला पोहोचला. तेव्हा बेलारूसला व्हिसा लागेल हे त्याला माहीत नव्हतं. त्यानंतर तेथील पोलिसांनी त्याला सैनिकांच्या स्वाधीन केलं. यानंतर रशियन सैनिकांनी त्याला पकडून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आणि त्याला शस्त्र प्रशिक्षणासाठी युक्रेनला पाठवलं. तसंच त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची धमकी देऊन रशियन भाषेत लिहिण्यात आलेल्या करारावर स्वाक्षरी करायला लावली. आम्ही एक आठवडाभर त्याच्याशी संपर्क साधू शकलो नाही. त्याच्यानंतर जेव्हा आमचं हर्षशी बोलणं झालं तेव्हा त्याने आम्हाला घडलेला प्रकार सांगितला."
हेही वाचा -
- विदेशात नोकरी शोधत असाल तर सावधान! रशियात गेलेल्या तरुणाचा युक्रेन विरोधातील लढाईत मृत्यू
- Russia and Ukarine War: रशिया- युक्रेन युद्ध समाप्तीसाठी रशियन नागरिकांनी केली हरिद्वारमध्ये गंगा मातेची पूजा, यज्ञही केला
- Russia-Ukraine War: 'आम्हाला शांतता हवी होती मात्र, पाश्चात्य देशांनी उचकवलं..', रशियन संसदेत म्हणाले पुतीन..