राची Hemant Soren ED custody : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. 31 जानेवारीला झालेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतर ईडीनं हेमंत सोरेन यांना अटक केली होती.
सात तासांच्या चौकशीनंतर अटक : आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सात तासाच्या तपासानंतर ईडीनं बुधवारी सोरेन यांना अटक केली होती. अटकेच्या भीतीमुळं त्यांना राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय काँग्रेसचे आलमगीर आलम, आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
पुढील 5 दिवस चौकशी होणार : रांची जमीन घोटाळा प्रकरणी ईडी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पुढील पाच दिवस चौकशी करणार आहे. कोर्टाकडून रिमांड मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांना कडेकोट बंदोबस्तात रांचीच्या बिरसा मुंडा सेंट्रल जेलमधून ईडीच्या कार्यालयात आणलं जाऊ शकतं. हेमंत सोरेनच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाभोवती विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना रांची जमीन घोटाळ्याप्रकरणी बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकानं अटक केली होती. अटकेनंतर हेमंत सोरेन यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना गुरुवारी दुपारी विशेष ईडी न्यायालयात हजर करण्यात आलं. ईडीकडून कोर्टात 10 दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही : हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळं त्यांचे वकील कपिल सिब्बल तसंच अभिषेक मनू सिंघवी यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश, न्या. बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठानं उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री असताना अटक : हेमंत सोरेन मुख्यमंत्री पदावर असतानाच त्यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. ईडीच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिमांड अर्जात अंमलबजावणी संचालनालयानं हा खुलासा केला आहे. हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता अटक करण्यात आली होती. अटकेचे कारण त्यांना सांगण्यात आले होते, असं रिमांड अर्जात म्हटलं आहे. मात्र, त्यावेळी हेमंत सोरेन यांनी राजीनामा देण्यासाठी वेळ मागितला होता, असंही ईडीनं विशेष न्यायालयाला सांगितलं.
हे वाचलंत का :