नवी दिल्ली Bharat Bandh : संयुक्त किसान मोर्चा 16 फेब्रुवारीला म्हणजेच आज 'भारत बंद' पाळणार आहे. या बंदमध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत देशातील सर्व शेतकरी संघटना सहभागी होतील. या पार्श्वभूमीवर पंजाबपासून हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
चर्चेची तिसरी फेरीही निष्फळ : केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या चर्चेची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. 13 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. 3 दिवस पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पंजाब आणि हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांना एक मीटरही पुढे जाऊ दिले नाही. त्यानंतर आज शेतकऱ्यांनी 'भारत बंद'चं आवाहन केलं आहे.
हरियाणातील सर्व टोलनाके मोफत : देशभरातील शेतकरी भारत बंदमध्ये सामील होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये अनेक ट्रक संघटना आणि कामगार संघटनाही सहभागी होत आहेत. हरियाणातील सर्वात मोठी शेतकरी संघटना भारतीय किसान युनियननं आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. संघटनेच्या वतीनं 16 फेब्रुवारी रोजी हरियाणातील सर्व टोलनाके मोफत ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. हरियाणातील सर्व टोलनाके दुपारी 12 ते 3 या वेळेत मोफत केले जातील.
कोणत्या सेवा बंद राहतील : भारत बंद दरम्यान भाजीपाला आणि इतर पिकांचा पुरवठा, खरेदी आणि विक्री बंद राहील. ग्रामीण भागातील भाजी मंडई, धान्य बाजार, शासकीय आणि निमसरकारी कार्यालयं, शासकीय संस्था आणि खाजगी आस्थापना बंद राहतील. शहरातील दुकानं आणि आस्थापनाही बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच खासगी आणि सरकारी वाहनंही धावणार नाहीत. मार्ग फक्त रुग्णवाहिका, लग्नाची वाहनं, वृत्तपत्र वाहनं, परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहनं आणि इतर आपत्कालीन सेवांसाठी खुला करण्यात येणार आहे. पंजाबच्या शेतकरी संघटनेच्या भारत बंदच्या आवाहनाला पाठिंबा देत पंजाबच्या खाजगी बस उद्योगानं 16 तारखेला पंजाबमध्ये सर्व खाजगी बस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
हे वाचलंत का :