रायपूर Sukma Naxal Encounter : पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. बस्तरमधील सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या परिसरात ही चकमक उडाली आहे. सकाळी सात वाजतापासून ही चकमक सुरू आहे. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. चिंतागुफा या परिसरात तब्बल 30 ते 40 नक्षलवादी जमल्याची माहिती पोलीस जवानांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस जवानांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
मोठ्या संख्येनं नक्षलवादी जमल्याची माहिती : सुकमा पोलीस दलातील जवानांना मिळालेल्या माहितीनुसार, करकनगुडा इथल्या जंगलात बटालियन सप्लाय टीम आणि जगरगुंडा एरिया कमिटीचे 30 ते 40 नक्षलवादी जमल्याची माहिती मिळाली. इतक्या मोठ्या संख्येनं नक्षलवादी जमा झाल्याची माहिती मिळाल्यानं सुकमा पोलीस दलातील डीआरजी, बस्तर फायटर्स आणि 206 कोब्रा बटालियनच्या जवानांना करकनगुडाच्या जंगलात पाठवण्यात आलं. यावेळी जवानांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
चकमकीत UBGL आणि BGL चा वापर : सुकमा पोलीस दलातील जवानांनी घटनास्थळावर धाव घेतल्यानंतर शोधमोहीम राबवली. यावेळी "नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे जवानांनी नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. अजूनही घटनास्थलावर जोरदार गोळीबार सुरू आहे. दोन्ही बाजूकडून UBGL आणि BGL नं हल्ला करण्यात येत आहे. चकमकीनंतर शोधमोहीम आणि जवान परतल्यानंतर या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकेल," असं सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितलं.
तीन नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण : सुकमा पोलीस दलाकडून राबवण्यात येत असलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. त्यामुळे अनेक नक्षलवादी नक्षल चळवळ सोडून आत्मसमर्पण करत आहेत. गुरुवारी तीन नक्षलवाद्यांनी सुकमा इथं पोलीस दलाच्या जवानासमोर आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण करणाऱ्या दोन नक्षलवाद्यांवर दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानं इतरही नक्षलवाद्यांनी नक्षल चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येऊन जीवन जगावं, असं आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
- छत्तीसगडनंतर तेलंगणातही सुरक्षा दलाच्या कारवाईत ६ नक्षलवादी ठार - Karakagudem naxal encounter
- तब्बल 25 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण; नक्षलवाद्यांच्या अत्याचारांमुळे सुरक्षा दलापुढं टाकली शस्त्र खाली - 25 Naxalites Surrender
- सात चकमकी, दोन जणांचा खून; छत्तीसगड, ओडिशात कारवाया करणाऱ्या जहाल नक्षलवादी महिलेचं आत्मसमर्पण - Naxal Woman Surrender In Gadchiroli