नवी दिल्ली Fali S Nariman Passes Away : प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस नरिमन यांचं नवी दिल्लीत निधन झालंय .नोव्हेंबर १९५० पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली होती. तर, १९६१ मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी ७० वर्षांहून अधिक काळ कायद्याचा सराव केलाय. त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केलंय.
कोण आहेत फली एस नरिमन? : फली एस नरिमन यांचा जन्म १० जानेवारी १९२९ रोजी झाला होता. मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतलीय. फली एस नरिमन यांनी मुंबईतील सरकारी विधि महाविद्यालयातून विधि शाखेची पदवी मिळवली.त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात १९५० पासून त्यांनी वकिलीला सुरूवात केली होती.वकिली केल्यानंतर १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ बनले. १९७२ मध्ये केंद्र सरकारनं त्यांना अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी नियुक्त केलं होतं.
विविध पुरस्कारानं सन्मानित : फली एस नरिमन यांचं देशासाठी विधि क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन सरकारनं 1991 मध्ये पद्मभूषण आणि 2007 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही राष्ट्रपतींनी 1999 मध्ये त्यांची नियुक्ती केली होती.