नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. त्यांचा आशिर्वाद घेतला. पंतप्रधान महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य करणार आहेत".
नव्या सरकारमध्ये खातेवाटप झालेलं नाही. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अजित पवार हे त्यांच्या कामानं आणि मी माझ्या कामानं आलो आहे. माझी आणि अजित पवारांच्या भेट झाली नाही. मंत्रिमंडळासाठी आमच्यात कोणताही तिढा नाही. एकनाथ शिंदे हे मुंबईत आहेत. आमच्या पक्षाचे नेते संसदीय मंडळ आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मंत्री ठरवितात. कोण मंत्रिपदाचे उमेदवार असतील हे ठरविण्यात आले आहे. मंत्रपदासाठी फॉर्म्यूला ठरला आहे, हे तुम्हाला लवकरच कळणार आहे".
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, "मोदी आमच्यासाठी पितृतुल्य व्यक्तीमत्व आहेत. आम्ही चुकलो तरी ते आम्हालादेखील रागावतात. त्यांना भेटणे ही आनंदाची गोष्ट असते. त्यांना छत्रपतीचीं प्रतिमा भेट दिली. कारण, रायगडला भेट देऊन त्यांनी प्रचाराची सुरुवात केली. छत्रपतींनी दाखविलेल्या मार्गावरूनच ते चालतात".
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " आमच्याकडूनदेखील शरद पवार यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी देशाची सेवा करत राहो, ही शुभेच्छा.