नवी दिल्ली Arvind Kejriwal ED Custody : दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलीय. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ केला. शुक्रवारी 'आप'च्या वतीनं देशभरात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. दिल्लीतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलं होतं. यावेळी पोलिसांनी 'आप'च्या मंत्री आतिशी, सौरव भारद्वाज यांना ताब्यात घेतलं होतं.
केजरीवालांना ईडी कोठडी : दिल्ली न्यायालयात शुक्रवारी दिवसभर अरविंद केजरीवाल यांच्या अटक प्रकरणावर सुनावली झाली. अखेर रात्री आठ वाजता केजरीवाल यांना न्यायालयानं 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री केजरीवाल यांना पुढील सहा दिवस ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे. ईडीनं केजरीवाल यांची 10 दिवसांची कोठडी न्यायालयाकडं मागितली होती. तर केजरीवाल यांच्यावतीनं कोठडी न देण्याची मागणी केली होती.
केजरीवाल यांची प्रतिक्रिया : "मी तुरुंगात असो वा बाहेर, माझे जीवन देशासाठी समर्पित आहे," अशी प्रतिक्रिया न्यायालयात हजर होण्याआधी अरविंद केजरीवाल यांनी दिली. केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात प्रवेश करताना केजरीवाल यांनी आपली भावना व्यक्त केली.
अटकेपासून संरक्षण नाकारलं होतं : दिल्ली दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना या अगोदरच अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ईडीनं या अगोदर तब्बल 9 वेळा समन्स बजावलं होतं. मात्र, ईडी चौकशीला न जाता अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलन सुरू केलं.
'आप'चे कार्यकर्ते आक्रमक : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या वतीनं दिल्लीत आंदोलन करण्यात आलं. आम आदमी पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आतिशी, सौरव भारद्वाज यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. तसंच महाराष्ट्रातही विविध ठिकाणी 'आप'च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भाजपावर हल्लाबोल केला होता. अटकेविरोधात विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही भाजपावर जोरदार टीका केली होती.
हेही वाचा :