नवी दिल्ली Farmer Protest : शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो मार्च'मुळे राजधानीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र तब्बल 5 तास चाललेली बैठक अनिर्णित राहिली. त्यानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलनाची घोषणा करत दिल्लीकडे कूच करणार असल्याचं सांगितलं.
सीमांचं छावणीत रूपांतर : सध्या दिल्लीच्या गाझीपूर, सिंघू, संभू, टिकरीसह सर्व सीमांचं छावणीत रूपांतर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वेषात समाजकंटकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमांवर वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रॅफिक जाममुळे लोकांना ऑफिसमध्ये पोहोचण्यास उशीर होतोय.
दिल्लीत कलम 144 लागू : शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. चिल्ला बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
निमलष्करी दलाचा मोठा बंदोबस्त : राजधानी दिल्लीत निमलष्करी दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी 5000 हून अधिक निमलष्करी दलं तैनात आहेत. तसेच दिल्लीच्या सर्व सीमेवर निमलष्करी दलाच्या 50 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास निमलष्करी दलाच्या आणखी 5 तुकड्या तैनात केल्या जातील.
संयुक्त किसान मोर्चाचा पाठिंबा नाही : येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, संयुक्त किसान मोर्चानं या आंदोलनापासून स्वत:ला वेगळं केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, आम्ही 13 फेब्रुवारी रोजी 'दिल्ली चलो'ची हाक दिलेली नाही आणि या आंदोलनाशी आमचा काहीही संबंध नाही. अशा आंदोलनांना बरखास्त करण्याऐवजी लोकशाही मार्गानं त्यावर तोडगा काढणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचं संयुक्त किसान मोर्चानं म्हटलं आहे.
हे वाचलंत का :