नवी दिल्ली Darbhanga to Delhi SpiceJet Flight : बुधवारी एका विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानं दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली. नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानं सर्वत्र घबराट पसरली. सुरक्षा एजन्सी आणि विमानतळाचे कर्मचारी सर्वच सतर्क झाले. दरभंगाहून दिल्लीला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता.
विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी : मिळालेल्या माहितीनुसार दरभंगाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती फोन करणाऱ्यानं कंट्रोल रुमला दिली होती. तसंच काही वेळातच विमानाला बॉम्बनं उडवण्यात येईल, असंही त्यानं फोनवर सांगितलं होतं. फोन आल्यानंतर काही वेळातच दरभंगाहून येणारं विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होतं. विमान उतरण्यापूर्वी सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या होत्या. विमानाची चौकशी केल्यानंतर हा कॉल 'हॉक्स कॉल' म्हणून घोषित करण्यात आला. यानंतर सुरक्षा यंत्रणांसह विमानतळ प्रशासनानंही सुटकेचा नि:श्वास सोडला.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्स्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट : विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असून हे विमान बॉम्बनं उडवून दिली जाईल, असा धमकीचा फोन आल्यानंतर काही मिनिटांतच विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. सुरक्षा चौकी बंद होती. सध्या राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट आहे. हा फोन कुठून आणि कोणत्या नंबरवरुन करण्यात आला होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. हा कॉल कोणी केला? यामागं काय कारण आहे? यासाठी पोलिसांची अनेक पथकं नेमली आहेत.
मुंबई विमानतळाला उडवण्याची धमकी : यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी एका ईमेलद्वारे आली होती. स्फोट टाळण्यासाठी मेल पाठवणाऱ्यानं 48 तासात 1 दशलक्ष डॉलर्स बिटकॉइनमध्ये भरण्याची मागणी केली होती. बिटकॉइनमध्ये रक्कम दिली नाही, तर परिस्थिती बिकट होईल, असंही ईमेलमध्ये म्हटलं होतं.
हेही वाचा :