नवी दिल्ली Citizenship Amendment Act : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू केला आहे. या कायद्यानुसार भारताच्या शेजारी असलेल्या देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी भारत सरकारनं यासाठी एक वेब पोर्टलही तयार केलं आहे. त्यावर अर्ज करुन नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकते. नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर देशभरात तगडी सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली. दुसरीकडं भाजपा नेत्यांनी या कायद्याचं स्वागत केलं आहे. तर काँग्रेस पक्षानं आगामी लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेऊन हा कायदा लागू केल्यानं त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
विरोधकांनी सीएएचा कायम विरोध केला : ईटीव्ही भारत प्रतिनिधींनी हरियाणाचे शिक्षण मंत्री कंवर पाल गुर्जर यांच्याशी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) बाबत खास बातचीत केली. "आपण नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ) चं स्वागत करतो. सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर खूप आनंदी आहे," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. "देशाची फाळणी झाली तेव्हा तिथं राहिलेल्या नागरिकांना तिथंच ठेवण्यात हे नेते जबाबदार होते. त्यामुळं पुढच्या काळात या नागरिकांची भारत काळजी घेईल, असं नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र अशा अल्पसंख्यांक नागरिकांची दखल घेण्यात आली नाही. शेजारच्या देशात जे पूर्वी 23 टक्के होते, ते आता 2 टक्क्यांवर आले. त्यामुळे या नागरिकांना भारतात येऊन जीव वाचवायचा असेल, तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी भारताची आहे. काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केले होते, मात्र इतर विरोधी पक्षांनी विरोध केला."
सरकारनं निवडलेली वेळ संशयास्पद : केंद्र सरकारनं देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. त्यामुळं शेजारील देसात असलेल्या अल्पसंख्यांक नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र सीएए लागू करण्याच्या सरकारच्या धोरणावर काँग्रेसनं मोठी टीका केली आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री परगट सिंह यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी "मला सीएए कायद्याच्या फायद्या तोट्यात जायचं नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्यानं काही नागरिकांना फायदा होईल. मात्र भाजपानं ही वेळ जाणूनबुजून निवडणली आहे. इलेक्ट्रोल बॉन्डच्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही वेळ सरकारनं निवडली," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
सीमा हैदरनं व्यक्त केला आनंद : भारत सरकारनं देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यानंतर त्याचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. प्रियकरासाठी पतीला सोडून पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर हिनं देखील नागरिकत्व सुधारणा कायद्याचं स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं वचन पूर्ण केलं," असं सीमा हैदरनं सांगितलं आहे.
हेही वाचा :