नवी दिल्ली- शिवसेना ठाकरे पक्षाच्या वकिलांनी आमदाराच्या अपात्रतेसंदर्भात लवकर सुनावणीचा आग्रह धरला. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे संतप्त झाले. सरन्यायाधीश त्या वकिलाला म्हणाले, "एक दिवस इथे बसा. मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही मोठ्या संकटातून पळ काढताल."
सरन्यायाधीशांनी वकिलांना सांगितलं की, " शिवसेनेच्या प्रकरणात याचिका पूर्ण झाल्या आहेत." राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादाच्या प्रकरणाच्या यादीबाबत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ज्येष्ठ वकील एनके कौल यांनी खंडपीठासमोर निवेदन केले की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी द्यावा. त्यावर राष्ट्रवादी आणि त्यांच्या ४० आमदारांना उत्तर दाखल करण्यासाठी दहा दिवसांचा अवधी देता येईल, असे खंडपीठानं म्हटलं आहे. यावेळी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या बाजूनं उपस्थित असलेल्या एका वकिलानं या प्रकरणात लवकर तारीख द्यावी, असा आग्रह धरला. तसेच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आल्याचं सांगितलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्याधीशांनी "कृपया न्यायालयाला आदेश देऊ नका," असे वकिलाला सुनावलं.
- सरन्यायाधीशांनी वकिलाला सांगितलं, "तुम्ही येथे येऊन एक दिवस का बसत नाही? तुम्हाला कोणत्या तारखा हव्या आहेत, हे कोर्ट मास्टरला का सांगत नाहीत? न्यायालयावर कामाचा दबाव किती आहे, हे शेवटी तुम्हीदेखील पाहिलं आहे. कृपया इथे येऊन बसा, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही येथील संकटातून पळ काढताल."
शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी
शिवसेनेतील फुटीनंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दुसरीकडं राष्ट्रवादीतही अजित पवार यांच्या बंडखोरीनंतरही तीच स्थिती निर्माण झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित करण्याच्या नार्वेकर यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटानेही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार आणि त्यांच्या ४० आमदारांना नोटीस बजावली होती.
- शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीबाबत असलेल्या वादांशी संबंधित दोन स्वतंत्र याचिकांची सुनावणी कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा-