बक्सर Floating House On Water : गेल्यावर्षी बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदीत एक अनोखा प्रयोग करण्यात आला. एका अभियंत्यानं चक्क गंगा नदीवर तरंगते घर बांधलं. या तरुण अभियंत्याचं नाव प्रशांत कुमार असं आहे. कॅनडा, जर्मनी, नेदरलँड अशा देशातील त्यांच्या मित्रांनीही त्यांना या कामात सहकार्य केलय. हा एक पायलट प्रोजेक्ट असून त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुराच्या दिवसात घरांच्या मोठ्या चिंतेतून लोकांची सुटका होईल, असं ते म्हणाले होते.
फ्लोटिंग हाऊस कोणत्या साहित्यांपासून बनले : हे घर बांधण्यासाठी वापरलेले सर्व साहित्य जवळपास सहज उपलब्ध होतात. त्यामुळं पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. जेव्हा पूर येतो तेव्हा हे घर गंगेच्या पाण्याबरोबर वर जाते आणि पूर संपताच ते पुन्हा आपल्या जागेवर येते. यामध्ये बेडरूम, किचन, बाथरूम आणि टॉयलेटही बांधले जात आहे. तसंच येथून बाहेर पडणारे घाण पाणी किंवा कचरा नदीत जाणार नाही, जेणेकरून नदीही प्रदूषित होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
तरंगते घर बांधण्याचा उद्देश काय? : पूर संपल्यानंतर पूरग्रस्तांना पुन्हा एकदा आपलं जीवन सुरू करावं लागतं. अशा लोकांच्या समस्या लक्षात घेऊन सरकार जी काही मदत करते ती काही दिवसांसाठीच मर्यादित असते. अशा परिस्थितीत, पाण्यावर तरंगणारी बोट त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासह आरामात राहू शकते आणि पुराच्या कहरापासून स्वतःचे संरक्षण करू शकते. गेल्या एक वर्षापासून बांधलेले हे 'फ्लोटिंग हाऊस' आता पटणाच्या दियारा भागात नेण्यासाठी तयार आहे. तेथील लोक सध्या पुरामुळं त्रस्त असून तेथे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर दिसून येईल, असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं.
घराची किंमत किती? : सुमारे 900 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या तरंगत्या घराची किंमत सुमारे 6 लाख रुपये आहे. प्रशांतच्या म्हणण्यानुसार, हे घर बांधण्यासाठी वापरण्यात येणारी वीट शेण, माती, भात आणि उडीद यांच्या भुशापासून बनवली जाते. या विटेचं वजन फक्त अडीच ते तीनशे ग्रॅम असतं. अशा परिस्थितीत पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता घरातील टाकाऊ वस्तूंपासून ही घरं तयार करण्यात आलीत. पेंटचे रिकामे ड्रम, इंजिन ऑइल, चिखल आणि शेण या साहित्यापासून त्यांनी हे घर बांधल्याचंही प्रशांत म्हणाले.
तरंगते घर सुरक्षित आहे का? : जेव्हा हे घर बनवलं जात होतं तेव्हा प्रशांतनं सांगितलं होतं की, फ्लोटिंग हाऊसचा अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी याचा वापर करता येतो. तसंच पुराच्या वेळी हे घर आपत्कालीन रुग्णालय म्हणून आणि सर्वात वाईट पूरस्थितीत निवारा म्हणून वापरले जाऊ शकते. त्यावेळी ते कितपत परिणामकारक ठरेल हे सांगणं कठीण आहे. परंतु, गेल्या वर्षभरापासून गंगेच्या लाटांचा तडाखा सहन करूनही हे घर तरंगत आहे.
हेही वाचा -