उत्तर प्रदेश (बहराइच) : बाबा सिद्दीकींच्या हत्येचं यूपी कनेक्शन समोर आलं आहे. गोळीबार करणाऱ्या 3 हल्लेखोरांपैकी 2 आरोपी हे उत्तर प्रदेशातील बहराइचचे रहिवासी आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या घरी दाखल झाले असून, आरोपींच्या कुटुंबीयांची चौकशी पोलिसांनी केली आहे.
आरोपींच्या कुटुंबीयांची केली चौकशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध उत्तर प्रदेशातील बहराइचशी असल्याचं समोर आले आहे. बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यातील दोन आरोपी हे बहराइचमधील कैसरगंज पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत. रविवारी मुंबई पोलिसांच्या माहितीवरून स्थानिक पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या घरी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली.
बहराइचमधील दोन आरोपी : बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यात लॉरेन्स विश्नोई टोळीचे नाव पुढे आले. त्याच्या शूटर्सनी ही हत्या केल्याचेही बोलले जात आहे. सध्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक फरार आहे. मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात बहराइचमधील कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गंडारा गावात राहणाऱ्या दोन तरुणांची नावे समोर आली आहेत. धर्मराज कश्यप आणि दुसरा शिव गौतम उर्फ बाल किशून अशी त्या आरोपींची नावं आहेत.
गावकरी हैराण : मुंबई पोलिसांच्या माहितीवरून, स्थानिक पोलिसांचं पथक दोघांच्या घरी पोहोचलं. कुटुंबीयांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही तरुण पुण्यात हातगाडीवर काम करायचे. महिनाभरापूर्वीच दोघेही पुण्याला गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज आणि शिव गौतम यांचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. तसेच दोघांवरही स्थानिक पातळीवर गुन्हा दाखल नाही. दोघेही सामान्य कुटुंबातील आहेत. हत्येप्रकरणी दोघांचीही नावे समोर आल्याने गावातील लोकही आश्चर्यचकित झाले आहेत.
हेही वाचा