अहमदाबाद : दोन भरधाव कारची समोरासमोर धडक होऊन तब्बल सात प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना जुनागड ते सोमनाथ या महामार्गावर भांदुरी गावाजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी 108 रुग्णवाहिकेमधून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या अपघातात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातात मृत्यू झालेल्या सातही जणांचे मृतदेह माळीया प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहेत.
भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू : माळीया तालुक्यातील भांडुरी गावाजवळ सकाळी जीजे 11 एस 4416 आणि जीजे 11 सीडी 3064 क्रमांकाच्या दोन कारची जोरदार धडक झाली. अपघातानंतर कारमधील सीएनजी गॅसचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या अपघातात एका प्रवाशाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. अपघाताची माहिती मिळताच माळीया गलू व केशोद 108 ची 1 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेमधून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात ठार झालेल्या सात जणांपैकी पाच जण विद्यार्थी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळावरुन कार बाजुला करण्याचं काम सध्या सुरू आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दुभाजक तोडून कार आदळली दुसऱ्या कारवर : दोन कारचा भीषण अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर मोठा आक्रोश झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला असावा, अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. या अपघातातील एक कार दुभाजकावरुन दुसऱ्या बाजुने येणाऱ्या कारवर जाऊन आदळली. त्यामुळे दोन कारचा भीषण अपघात झाल्यानं यात सात जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :