हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाब हा वयाप्रमाणे आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. यामुळे स्ट्रोक्स, हृदय विकार आणि किडनी विकार उद्भवू शकतात. जगभरात लोकांना उच्च रक्तदाबाबद्दल माहीत आहे, पण तरीही त्यांना या स्थितीबद्दल पूर्णपणे माहीत नसते. किंवा ते अचूक कसे मोजायचे याची माहिती नसते. म्हणूनच दर वर्षी १७ मे रोजी वर्ल्ड हायपरटेंशन लिग ( डब्लूएचएल ) जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे, ‘ तुमचा रक्तदाब तपासा, नियंत्रित करा, खूप वर्ष जगा ’
जागतिक आरोग्य संघटनेच्या ( डब्ल्यूएचओ ) आकडेवारीनुसार (२०१९ ) जगभरात अंदाजे १.१३ अब्ज लोकांना उच्च रक्तदाब आहे. त्यापैकी बहुतेक जण ( दोन तृतीयांश ) कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. २०१५ मध्ये, ४ पैकी १ पुरुष आणि ५ पैकी १ महिलांना उच्च रक्तदाब होता. याची कोणतीही लक्षणे नसल्यामुळे, लोकांना ही स्थिती उद्भवू शकते. याची सहसा माहिती नसते. म्हणूनच उच्च रक्तदाब हा “ सायलेंट किलर ” म्हणून देखील ओळखला जातो. म्हणूनच, रक्तदाबावर नियमितपणे लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
उच्च रक्तदाब म्हणजे काय ?
‘शरीरात रक्तसंचार करण्यासाठी दबावाची आवश्यकता असते. तोच रक्तदाब. हा दबाव सांभाळण्याचे कार्य रक्तवाहिन्या करत असतात. रक्तदाब जास्त असेल तर हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाब होतो. ’जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. रक्तदाब मोजण्यासाठी अशी साधने उपलब्ध आहेत, जी तुम्हाला दोन रीडिंग देतील. एक सिस्टोलिक आहे. त्यात हृदय संकुचित होते किंवा धडधडते तेव्हा रक्तवाहिन्यांमधील दाब मोजला जातो आणि दुसरे डायस्टोलिक. यात हार्ट बीट्सच्या दरम्यान रक्तवाहिन्यांमधील दबाव मोजला जातो.
पुढे जाऊन जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की जर वेगवेगळ्या दिवशी रक्तदाब दोनदा मोजले गेले आणि दोन्ही रीडिंगमध्ये सिस्टोलिक रक्तदाब ≥140 मिमीएचजी आहे किंवा दोन्ही रीडिंगवर डायस्टोलिक रक्तदाब ≥ 90 मिमीएचजी असेल,
तर उच्च रक्तदाब आहे. एकदा का आपले निदान झाले की आपण कोणती औषधे किंवा उपचार आवश्यक आहेत हे जाणून
घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. उच्च रक्तदाबाशी कसा करायचा सामना ? हैदराबादच्या व्हीआयएनएन हाॅस्पिटलचे जनरल फिजिशियन, आमचे तज्ज्ञ डॉ. राजेश वुकला, एमडी (जनरल मेडिसिन) यांनी उच्च रक्तदाबावर कसे नियंत्रण ठेवायचे याबद्दल सांगितले.
1. दिनचर्या – व्यवस्थित दिनचर्या ठेवा. वेळेवर उठा आणि वेळेवर झोपा. जेवणाची वेळ निश्चित असू द्या. व्यायाम करा आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली असू द्या.
2. कॅफेन टाळा – कॅफेन घेऊ नका. ते जास्तीत जास्त टाळायचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. अर्थात, हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून आहे.
3. जंक फूड नको – साखर, कॅलरीज आणि रिफाइण्ड कार्ब्सपासून तयार केलेल्या जंक फूडपासून दूरच राहा. यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. घरी शिजवलेले, आरोग्यदायी आहार घ्या.
4. व्यायाम - डॉ. राजेश यांनी मेडिटेशन, योग आणि चालणे हे व्यायाम सांगितले आहेत. तणावापासून मन आणि निवांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन महत्त्वाचे आहे. त्याशिवाय रक्तदाब कमी करण्याचा आणि हृदयाचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यायाम करणे उत्तम.
5. आरोग्यपूर्ण वजन - आपले बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ठेवा नियंत्रणात. आदर्श बॉडी मास इंडेक्स 23 (+ किंवा - 1) असावा. वजन वाढले तर तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, योग्य आरोग्यदायी वजन टिकवून ठेवा.
6. सोडियमचे कमी सेवन - आपल्या आहारात सोडियमचे सेवन कमी करा. विशेषत: सॅलड, फळे इत्यादीत मिठाची गरज नसते. जास्त प्रमाणात मीठ आपल्या रक्तदाब पातळीवर परिणाम करू शकते.
7. धूम्रपान / मद्यपान करू नका - तुम्ही अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा किंवा ते पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करा. तसेच
धूम्रपान सोडा.
डॉ. राजेश सांगतात, ‘ गेले तीन दशके लोक बऱ्याच तणावांना तोंड देत आहेत. साधारण पन्नाशीनंतर रक्तदाबाचा त्रास होऊ लागायचा. पण हल्ली जास्त तरुणांना हा त्रास होत आहे. म्हणूनच प्रत्येकाला तणावाला कसे सामोरी जायचे आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही, हे ठाऊक हवेच. ’
रक्तदाब तपासतानाच्या टिप्स
रक्तदाब अचूक तपासण्यासाठीच्या टिप्स पुढीलप्रमाणे –
- बीपी तपासताना संभाषण करू नका
- हाताला उशीचा आधार द्या किंवा हृदयाच्या लेव्हलमध्ये
हात टेबलावर ठेवा
- कफ मोकळ्या हाताला गुंडाळा. हातावर कसलाही कपडा
नको.
- खुर्चीला टेकून बसा आणि पाय जमिनीवर ठेवा.
- पाय क्राॅस करून बसू नका.
- बीपी पाहण्याआधी लघवी करून बसा. मूत्राशय रिकामे
ठेवा.
- काही काम केल्या केल्या बीपी तपासू नका. १० मिनिटे
शरीराला आराम द्या आणि मगच रक्तदाब पाहा.
कोविड १९ आणि उच्च रक्तदाब
तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आणि तुमच्या रक्तदाबाचे रीडिंग सामान्य नसेल तर लगेच आपल्या डॉक्टरांशी बोला. विशेषत: सध्या सगळीकडे कोविड १९ ची महामारी पसरली आहे. तेव्हा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना अतिरिक्त सावध असणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब एक कोमोर्बालिटी मानली जात असल्याने, या स्थितीत असलेल्या लोकांना कोविड १९ च्या तीव्र संसर्गाचा धोका जास्त असतो. जागतिक आरोग्य संघटनेने खालील गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगितल्या आहेत.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदाबाची औषधे नियमित घ्या.
शक्य असेल तर घरी बीपी तपासत जा. नेहमीपेक्षा ते कमी किंवा जास्त असू शकते. तेव्हा औषध न बदलता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीरात कमी द्रवपदार्थ असल्यामुळे बीपी कमी होते.
शरीरात द्रव पदार्थ पुरेसे असू द्या – बरेच लोक, विशेष करून वयस्कर लोक कमी पाणी, द्रव पदार्थ घेतात. तेव्हा शरीरात पेय व्यवस्थित जाईल ही काळजी नियमित घ्या.
शारीरिक व्यायाम – सध्या कोरोना विषाणूमुळे सगळे जास्त वेळ घरी असतात. शारीरिक हालचाली कमी होऊ शकतात. त्याचा एक उपाय म्हणजे, घराबाहेर सोशल डिस्टंसिंग ठेवून चाला. कठीण काळात आरोग्यदायी आणि मनोबल वाढवणारी ही क्रिया आहे.