भारतात ऑक्सफर्डची अॅस्ट्राझेनेका कोव्हिड-१९ लसही वापरली जात आहे. ती चिंपांझीच्या विष्ठेतून काढलेल्या ऍडेनोव्हायरसपासून तयार केली आहे. त्यात अनुवांशिकरित्या बदल झाले आहेत. माणसांमध्ये त्याची वाढ होणे शक्य नाही. आता ही लस कोव्हिड-१९ वॅक्सिन अॅस्ट्राझेनेका म्हणून ओळखली जात असली तरी या लसीला पूर्वी एझेडडी-१२२२ असे म्हटले जात असे. एझेडडी-१२२२ चा शोध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि त्यांची सह कंपनी वॅक्सिटेक यांनी मिळून लावला आहे. चिंपांझीमध्ये संसर्ग झालेल्या सर्वसाधारण सर्दीच्या विषाणूची कमकुवत प्रतिकृती आणि सार्स को-व्ही २ विषाणूच्या स्पाइक प्रोटिनमधले अनुवांशिक घटक वापरून ही लस तयार केली आहे.
अनेक देशांकडून लसीला मंजुरी
लसीकरणानंतर पृष्ठभागावरील स्पाइक प्रथिने तयार केली जातात, जी नंतर व्यक्तीच्या शरीरात संसर्ग झाल्यास सार्स को-व्ही -2 विषाणूवर हल्ला करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार करतात. सहा खंडांतील एकूण ७० देशांमध्ये या लसीला मंजुरी मिळाली आहे. जगातली लस बनवणारी सर्वात मोठी कंपनी म्हणजे भारतातली सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया. या कंपनीने ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेका कोव्हिड-१९ ची प्रतिकृती तयार केली. भारतात ती ‘कोव्हिशील्ड’ म्हणून दिली जात आहे.
कोरोनाचे आकचे चिंताजनक
भारतात कोव्हिड-१९ च्या विरोधात लसीकरणाच्या प्रयत्नांना वेग येत आहे. गेल्या २४ तासांत देशात १,०३,५५८ नव्या कोव्हिड रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षात महामारी सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा आकडा आहे. सोमवारी हा एकूण आकडा १,२५,८९,०६७ वर पोहोचला होता. सोमवारी ४७८ नव्या मृत्यूंची भर पडून मृतांची संख्या १,६५,१०१ झाली आहे. अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत १,१६,८२,१३६ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृत्यू दर १.३१ टक्के आहे.
भारतात वेगाने लसीकरण
कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मान्यता मिळाल्यानंतर १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत ७.९१ कोटी कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम आरोग्य सेवकांसाठी सुरू झाली. त्यानंतर २ फेब्रुवारीपासून अग्रभागी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरू झाले. नंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ दरम्यान दिलेल्या २० कोमोर्बिडीटीज असलेल्यांसाठी लसीकरण सुरू झाले. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांपासून पुढच्या वयोगटातल्या सर्व व्यक्ती कोव्हिडची लस घेऊ शकतात.