जागतिक ओआरएस (ORS) दिवस : या गोष्टी माहिती हव्याच
डिहायड्रेशनवर योग्य उपचार, विशेष करून लहान मुलांसाठी आहे तो ओरल रिहायड्रेशन साॅल्ट. याबद्दलची जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी २९ जुलै हा जागतिक ओआरएस दिवस मानला जातो. एखाद्याला अतिसार किंवा दुसऱ्या कुठल्या आजारामुळे डिहायड्रेशन झाले, तर ते रिहायड्रेशन होण्याचा हा उत्तम उपाय आहे. हैदराबादचे रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे डॉ. विजयनंद जमालपुरी, एमडी एमआरसीपीसीएच (यूके), कन्सल्टंट नियोनाटोलॉजिस्ट म्हणतात, ‘ ओआरएस हा एकदम साधे आणि आयुष्य वाचवणारा द्रव पदार्थ आहे. अतिसारामुळे ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे मृत्यू होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे डिहायड्रेशन. अतिसार झाला की शरीरातून मीठ , साखर आणि पाणी जायला सुरुवात होते आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस हा उत्तम उपाय आहे. ओआरएस कुठेही वैद्यकीय दुकानांमध्ये मिळू शकते आणि जलद तयारही करता येते.’
ओआरएस फॉर्म्युलेशन
पिण्यासाठी तयार पेय
तुम्ही कुठल्याही वैद्यकीय दुकानातून ओआरएस विकत घेऊ शकता. पण त्यावर WHO recommended ORS अशी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेले लेबल हवे. दुसऱ्या कुणी व्यावसायिकरित्या उत्पादन केलेल्या ओआरएस फॉर्म्युलेशनमध्ये गरजेपेक्षा कदाचित साखरेचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे जास्त अपाय होण्याची शक्यता असते.
ओआरएस पावडरच्या स्वरूपात असले तर त्यावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि शुद्ध पाण्यातच हे पेय तयार करा.
घरी बनवण्याची पद्धत
शुद्ध १ लीटर पाणी घ्या
त्यात ६ टी स्पून ( चहाचा चमचा ) साखर घाला
त्यात १/२ टी स्पून ( चहाचा चमचा ) मीठ घाला
साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिसळा
ओआरएससाठी उकळलेले आणि नंतर थंड केलेले पाणी घेण्यास सांगितले जाते. शिवाय साखरेचे प्रमाण जास्त झाले तर ते अतिसारास हानिकारक आहे किंवा मीठ जास्त झाले तरीही ते अपायकारक आहे.
काय लक्षात ठेवाल ?
डॉ. विजयनंद यांनी सांगितलेल्या काही टिप्स
जास्त अतिसार असेल तर ५० – १०० मिली ओआरएस देता येईल आणि व्यक्तीला गरज असेल तेवढे देता येईल.
जुलाब आणि उलट्या जास्त होत असतील, तर शरीर मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ स्वीकारू शकणार नाही. तेव्हा ओआरएस पूर्ण पेलाभर देण्यापेक्षा हे चमच्या चमच्याने पाजावे.
अतिसारात तुम्ही एक-दोन दिवस डॉक्टरांचा सल्ला घेण्याआधी ओआरएस द्रव देऊ शकता.
समजा जोरदार ताप, शौचात रक्त, लघवी कमी होणे किंवा पोट खाली उतरणे ही लक्षणे दिसली तर मात्र ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
तुम्ही ओआरएस हे पिण्याच्या पाण्याजागी दिवसभर घेऊ शकता.
मुल सशक्त असेल, नियमित चांगला आहार घेत असेल तर पाण्याजागी ओआरएस देऊ नका. त्याची गरज नसेल तर अति साखर आणि मीठ शरीराला हानिकारक आहे.
मुलांना ओआरएसची चव आवडली नाही, तर तुम्ही दुसरा स्वाद निवडू शकता. फक्त त्यावर WHO recommended ORS अशी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेले लेबल हवे.
अतिसाराची लक्षणे सुरुवातीला आढळली तर ओआरएस मुलांना किंवा प्रौढांना देता येईल. यामुळे तब्येत जास्त बिघडणे, रुग्णालयात भर्ती होणे आणि इंजेक्शन, सलाइन उपचार यापासून बचाव करता येऊ शकतो.
फक्त अतिसारामुळे नाही तर भूक न लागणे यासारख्यांमुळेही डिहायड्रेशन होऊ शकते.
हे खूप सुरक्षित आहे आणि तुम्ही डॉक्टरांचा सल्ला न विचारताही मुलांना देऊ शकता.
समजा मुलाची तब्येत जास्त बिघडली, तर रुग्णालयात नेताना ओआरएस फॉर्म्युलेशन देत राहावे. त्याचा उपयोग होईल.
अतिसार थांबवायला औषध देऊ नये
बॅक्टेरियामुळे अतिसार झाला असेल तर अँटिबायोटिक्स देता येतील, पण अर्थात डॉक्टरांचा सल्ला घेऊनच.
फक्त मुलेच नाही तर प्रौढांनाही ओआरएसचा उपचार करता येऊ शकतो. म्हणूनच हे खूप साधे , सहज उपलब्ध होणारे आणि आयुष्य वाचवणारे फॉर्म्युलेशन आहे आणि लोकांमध्ये याची जास्त जागरुकता करणे आवश्यक आहे.