हैदराबाद : पुण्यातील संरक्षण संस्था ( DRDO ) संचालक पी. एम. कुरुलकर यांना एटीएसने अटक केल्यानंतर देशभरात हनी ट्रॅपची चर्चा सुरू झाली आहे. दिवसेंदिवस हनी ट्रॅपचे प्रकरणे वाढू लागली आहेत. या हनी ट्रॅपचा वापर साधरण देशातील संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फसवून त्यांच्याकडून सुरक्षेची माहिती मिळवण्यासाठी केला जातो. पण बहुतेकांना हनी ट्रॅपचा अर्थ काय किंवा हा प्रकार काय असतो, हेच माहिती नाही. आज आपण साध्या आणि सोप्या भाषेत हनी ट्रॅप म्हणजे काय आहे, हे जाणून घेणार आहोत.
काय आहे हनी ट्रॅप : एखाद्या व्यक्तीला सुंदर स्त्रियांच्या मोहात पाडून त्यांच्याकडून विविध प्रकरची गोपनिय माहिती काढली जाते. ही माहिती कधी देशाच्या सुरक्षेविषयी आणि काही महत्त्वाच्या घडामोडीविषयीची असते. आपल्या जाळ्यात व्यक्ती अडकवून माहिती मिळवणे याला हनी ट्रॅप म्हटले जाते. याला हनीपॉट देखील म्हटले जाते. हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये विशेषत: सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच मह्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये अडकले जाते.
सगळ्याच क्षेत्रात वाढला प्रकार : राजकारण असो कॉर्पोरेट कार्यालय, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात या हनी ट्रॅपचा वापर केला जातो. महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती काढली जाते. यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. दरम्यान हनी ट्रॅप हा शब्द ब्रिटीश इंग्रजीमध्ये खूप चर्चेत आहे. हेरगिरीच्या क्षेत्रात हा शब्द वापरला जातो. आता आपण हा माध्यमांमध्ये ऐकत आहोत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून होतो हनी ट्रॅप : हा प्रकार आधीपासून चालू आहे, परंतु याचे स्वरुप बदलले आहे. आधी हनी ट्रॅप करणारी व्यक्ती ही आपल्या टार्गेट व्यक्तीच्या समोर जात असे. त्याला आपल्या बोलण्यात अडकवत असे. त्यानंतर त्याला शरीरसुखाची ऑफर देत त्याचा विश्वास संपादित करत असे. त्यानंतर त्याच्याकडून महत्त्वाची माहिती, गुपिते काढून घेत असे. आता या हनी ट्रॅपचे रुप बदललेले आहे. एखाद्या व्यक्तीला अडकविण्यासाठी आता सोशल मीडियाचा वापर केला जातो.
न्यूड फोटोची होते मागणी : फेसबुक, व्हॉट्सअॅप, आदी चॅट करता येणाऱ्या सोशल मीडियाचा वापर हनी ट्रॅपसाठी केला जातो. याच्या माध्यमातून समोरील व्यक्तीशी ओळख केली जाते. त्याचा विश्वास संपादित करत त्याला न्यूड फोटो पाठवली जातात. विश्वास संपादित करण्यासाठी त्यालाही न्यूड फोटो पाठविण्यास सांगितले जातात. टार्गेट केलेली व्यक्ती आपल्या जाळ्यात अडकल्याचे समजले तर त्याच्याकडून आवश्यक माहिती काढली जाते.
असे अडकवले जाते जाळ्यात : एखादी व्यक्ती एखाद्याला सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरुन मेसेज केला जातो. मग त्यांच्या गप्पा सुरु झाल्या की ती व्यक्ती आपल्या टार्गेट व्यक्तीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर हळूहळू त्यांच्यातील गप्पा या सेक्सच्या विषयावर जातात. त्यानंतर न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले जातात. एकदा का अशी चॅट केली तर त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते.
आयएसआयकडून होतो वापर : हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये 2014 पासून वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. सीमेपलीकडील शत्रू राष्ट्र या पद्धतीचा वापर करून देशातील मह्त्त्वाच्या व्यक्तींना यात ओढून त्यांच्याकडून मह्त्त्वाची माहिती मिळवत असते. किंवा पीडित व्यक्तीला देशविघातक कृत्य करण्यास सांगितले जाते. आयएसआयकडून हनी ट्रॅपचा वापर केला जात आहे. इस्लामाबादेत असणाऱ्या भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवले जाते. काही वर्षांपुर्वी दुतावासातील तीन कनिष्ठ कर्मचाऱ्यांना यात फसवण्यात आले होते. विशेष म्हणजे संरक्षण संशोधन संस्थेमधील व्यक्तींना देखील यात फसवण्यात आल्याने देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लष्करी अधिकारी टार्गेटवर : लष्करी अधिकारी असतील म्हणजेच कोणत्याही दलातील कार्यरत अधिकारी, जवानांना या ट्रॅपमध्ये ओढले जाते. निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना यात अडकवले जाते. जे तरुण लष्करमध्ये जाण्यास उत्सुक असतात त्यांनाही या हनी ट्रॅपमध्ये अडकले जाते. पाकिस्तानने या प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. कराचीमध्ये आयएसआयकडून एक सायबर कॅफे चालवला जात असल्याचे वृत्तसुद्धा काही माध्यमांमध्ये आले होते. पाकिस्तानने याचा वापरकरुन ब्राह्मोस या मिसाईलची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. या मिसाईल प्रोजेक्टवरती काम करणारा निशांत अगरवाल यालाही हनी ट्रॅपमध्ये अडवण्यात आल्याचे म्हटले जाते. अगरवाल याने या मिसाईलविषयीची माहिती आयएसआयला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
हेही वाचा - Aligarh Crime : यमुना एक्सप्रेस वेवर यूट्यूबर अगस्त्य चौहानचा मृत्यू, बाईक रायडिंग स्पर्धेतून खून झाल्याचा कुटुंबाचा आरोप