कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पाऊसाने उसंत घेतल्यानंतर आता थंडीने आपली बॅटिंग सुरू केली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानात एकदम घसरण झाल्याने थंडी जाणवू लागली आहे. सकाळी आणि रात्रीच्या थंडीने अंगात हुडहुडी भरत असून आज बुधवारी सकाळी किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले असल्याने थंडी अधिक जाणवत होती. यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावरच शेकोटी करत ,चहाचा आस्वाद घेताना पहायला मिळत आहे. दरम्यान येत्या काही दिवसात हेच तापमान कायम राहणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे.
थंडी वाढू लागली: कोल्हापूर जिल्ह्यात साधारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून परतीच्या पाऊस संपून थंडीला सुरुवात होत असते. मात्र यंदा ऑक्टोबर संपत आला तरी परतीचा पाऊस काय थांबत नाही आहे. पाऊस ही दिवाळी करून जाणार असे वाटत असताना अचानक गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली असून पहाटे आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी वाढू लागली आहे. शिवाय दिवसभर सूर्यनारायणाचे दर्शन होत असतानाही वातावरणात थंडी जाणवू लागली आहे.
तापमानात घसरण: जिल्ह्याचे किमान तापमानात एकदम घसरण झाल्याने थंडी जाणवू लागली आहे. नदी, विहीर, ओढ्याच्या काठावरून जाताना अंगावर काटा येत आहे. साधारणत: सकाळी साडेआठ पर्यंत वातावरणात गारठा जाणवत आहे. शिवाय दिवसभरही हा गारठा जाणवतो. सायंकाळी साडेसहानंतर पुन्हा थंडी जाणवू लागली. रात्री त्यामध्ये वाढ होत गेली. यामुळे ठिकठिकाणी पहाटे फिरायला आणि व्यायमसाठी जाणाऱ्या लोकांनी आता रस्त्याच्या कडेला शेकोटी करत गरम चहाचा आस्वाद घेताना पहायला मिळत असून ऐन दिवाळीत मोठ्या प्रमाणत थंडी वाढू लागल्याने अनेक जण दिवसभर स्वेटर आणि उबदार कपडे परिधान करत आहेत. आगामी आठवडाभर तापमानात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
अशी घ्या काळजी: शक्य असल्यास काही प्रमाणात सुका मेवा (Dry fruits) खावा. रात्री झोपताना किमान 1 ग्लास दूध प्यावे. मूग, चणे यासारख्या कडधान्यांना आहारात प्राधान्य द्यावे. ताजी फळे किंवा सॅलडचे प्रमाण वाढवावे. दिवसातून शक्यतो 8 ते 10 ग्लास पाणी पिलेले बरे. जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा. तसेच, दिवसभर स्वेटर आणि उबदार कपडे परिधान करा.
असे बॉडी लोशन वापरा: हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. या वारावरणात चेहऱ्यावरच नाहीतर संपूर्ण शरीरावर चांगल्या बॉडी लोशनचा किंवा मॉयश्चरायझरचा (Use of Body Lotion) वापर करणे आवश्यक असते. बॉडी लोशन त्वचेसाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी लोशनचा वापर करणे आवश्यक असते. जर स्किन ड्राय होत असेल तर अशा बॉडी लोशनचा वापर करा ज्यामध्ये दूध आणि ग्लिसरीन मुबलक प्रमाणात असेल.