हैदराबाद - सौंदर्य प्रसाधनाच्या थरांखाली तुमची त्वचा लपवण्याचा ट्रेंड(कल) सोशल मीडियावर सुरू झाला असून त्यात मऊ आणि चमकदार त्वचा दाखवली जाते. परंतु, इतके सौंदर्य प्रसाधन करून त्वचा खराब का करून घ्यायची? जेव्हा तुम्ही साधी योगासने करून आश्चर्यकारक अशी चमकदार त्वचा प्राप्त करू शकता. आमच्या मार्गदर्शक विमल योगाच्या संस्थापक रिचा आर्या(एमए योगाचार्य) यांनी काही आसने सुचवली असून ती कशी उपयोगी ठरतात, हेही सांगितले आहे.
पश्चिमोत्तासन -
या आसनामुळे चेहऱ्याकडे रक्ताचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो. त्वचेच्या पेशींना प्राणवायुचा पुरवठा वाढतो. इतकेच नाहीतर धुलीकणांमुळे त्वचेचे जे नुकसान होते त्याचा मुकाबला करण्यासाठी सहाय्यकारी पोषक द्रव्यांचा पुरवठा करते आणि त्वचेचे संरक्षण करते.
- जमिनीवर पाय ताणलेल्या अवस्थेत सरळ करून बसा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा.
- श्वास घ्या आणि तुमचे हात तुमच्या डोक्यावर नेऊन हळूहळू श्वास बाहेर सोडत पुढच्या दिशेने वाका.
- तुमच्या पायाची बोटे पकडण्याचा प्रयत्न करा. जितके जास्त करू शकाल तेवढे करा. परंतु, जास्त जोर लावू नका.
- आता श्वास घ्या आणि वर या. ही कृती दोन ते तीन वेळा करा.
- आता पुढे वाका आणि २० ते ६० सेकंदांपर्यंत हीच स्थिती कायम ठेवा आणि हे करताना खोलवर श्वास घ्या आणि पूर्वस्थितीत परत या.
चक्रासन -
खूप जास्त प्रमाणात पाठ वाकवल्याने छातीचा पिंजरा खुला होण्यास मदत होते आणि अधिक प्राणवायू ओढून घेण्यासाठी फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. हे आसन तणाव कमी करते आणि चेहऱ्यावरील पुरळ तसेच पिंपल्स फुटण्यास जबाबदार असलेल्या संप्रेरकांना संतुलित करते.
- तुमच्या पाठीवर सरळ पडून रहा
- गुडघे अशा रितीने वाकवा की तुमचे पाय जमिनीला सपाट राहतील. मात्र, त्यांच्यात थोडे अंतर राहिल(नितंबांना समांतर)
- तुमचे हात खांद्यांवर अशा रितीने ठेवा की बोटांची दिशा तुमच्या खांद्यांकडे राहिल
- आता तुमचे तळहात आणि पायांवर शरीर संतुलित करा, तुमच्या शरीराचा वरचा भाग पुढे ढकला आणि खालचा भाग चटईवरून उचला.
- तुमचे डोके हवेत लटकू द्या. परंतु, तुमच्या मानेवर ताण येणार नाही, याची खात्री करा
- ५ ते १० वेळा ही स्थिती ठेवा आणि अत्यंत हळूहळू पूर्ववत सामान्य स्थितीकडे परत या. तुम्ही जर झटका देत पूर्वीच्या स्थितीत आला तर तुमच्या डोक्याला इजा होऊ शकते.
सर्वांगासन -
चमकदार त्वचेसाठी हे आसन सर्वाधिक प्रभावी आसन समजले जाते. चेहऱ्याच्या दिशेने रक्ताभिसरणाला चालना देऊन त्वचेची घडण आणि दर्जा सुधारण्यास हे आसन मदत करते. दिवसातून ३ ते ५ वेळा हे आसन केल्यास तुमची त्वचा यौवनपिटिका, पुरळ, सुरकुत्या आणि निस्तेजपणा यापासून सुटका मिळवू शकेल.
- हात तुमच्या बाजूला घेत पाठीवर पडून रहा.
- एकाच हालचालीत तुमचे पाय, नितंब आणि पाठ हवेत वर उचला, शरीराचे संतुलन तुमच्या खांद्यावर तोलून धरा.
- तुमच्या हातांच्या मदतीने पाठ अशीच काही वेळ उचलून धरा आणि हाताचे कोपरे जवळ आणा.
- तुमचे पायही सरळ करून जवळ आणा आणि पायाच्या बोटांची दिशा छताकडे असू द्या.
- जर तुम्हाला काही तणाव वाटत असेल तर, सामान्य स्थितीला परत या अन्यथा तुम्ही ३० ते ६० सेकंद ही स्थिती ठेवू शकता.
- तुमचे तळहात जमिनीवर ठेवत अत्यंत हळूहळू तुमचे गुडघे खाली आणा, त्यानंतर पाठ, नितंब आणि पाय क्रमाक्रमाने खाली आणा.
हलासन -
हलासन हे तुमच्या मनःशांतीसाठी, तणाव आणि थकवा कमी करण्यासाठी तसेच तुमची चयापचय क्रिया सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हलासनाने ते बरे होऊन आपोआप आरोग्यसंपन्न आणि चमकदार चेहरा प्राप्त होतो. तुमची चयापचय क्रिया नियमित करण्यासाठी आणि शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी हे आसन मानले जाते.
- हे आसन सहसा सर्वांगासनानंतर केले जाते.
- सर्वांगासन केल्यानंतर सामान्य स्थितीत परत येण्याऐवजी तुमचे ताठ केलेले पाय तुमच्या डोक्यावर अशा पद्धतीने आणा की तुमचे नितंब छताच्या दिशेने असतील.
- तुमचे हात आधारासाठी तुम्ही पाठीवर ठेवू शकता किंवा जमिनीवरही ठेवू शकता. तुम्ही हात एकमेकात गुंतवून तुमच्या पायांच्या विरूद्ध दिशेला ताणूही शकता.
- तुम्ही जितका वेळ राहू शकता तितका वेळ या स्थितीत राहा आणि हळूहळू प्रथम ताणलेले पाय वर करून, नंतर तुमचे तळहात जमिनीवर ठेवत त्यानंतर क्रमाक्रमाने पाठ, नितंब आणि पाय खाली आणा.
ही सर्व आसने तुम्हाला नैसर्गिक चमकदार त्वचा प्राप्त करून देतील, जी कोणत्याही रसायनाने तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनाच्या किंवा त्वचेची उत्पादने देऊ शकत नाहीत.