कोविड १९ च्या लसीबद्दलचे सर्वसामान्य समज – गैरसमज
जवळ जवळ वर्षभर खूप वाट पाहिल्यानंतर आणि संयम बाळगल्यानंतर २०२१ ची सुरुवात भारतात लसीकरणाच्या मोहिमेची चांगली बातमी देऊन झाली. आरोग्य मंत्रालयाने देशात आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मान्यता दिली – त्या म्हणजे कोविशिल्ट आणि कोव्हॅक्सिन. आणि आता प्रत्येक जण लस कधी टोचली जात आहे आणि आपण नेहमीच्या आयुष्याला निर्भयपणे कधी सुरुवात करू, याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तरीही लस टोचून घेण्याची वाट पाहणाऱ्यांपैकी काही जणांच्या मनात लसीच्या रिअॅक्शनची आणि परिणामांची भीतीही आहे. काही खरे असले, तरी बऱ्याच अफवाही आहेत. म्हणून ई टीव्हीच्या सुखीभव टीमने यशोदा रुग्णालयाच्या जनरल फिजिशियन डॉ. एम. व्ही. राव यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे –
कोविड १९ लसीकरण सगळ्यांसाठी बंधनकारक आहे का ?
कोविड १९ लसीकरण सगळ्यांसाठी बंधनकारक नाही. लोक स्वेच्छेने लस घेऊ शकतात. पण हे लक्षात घ्यायला हवे की ज्यांना कोविड होऊन गेला, त्यांच्या शरीरात कोविड विरोधात अँटिबाॅडीज तयार होऊ शकतात. त्यामुळे काही महिने कोविडपासून त्यांना संरक्षण मिळेल, पण ते कायमचे नाही. म्हणूनच कोविडला हरवण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम आणि खात्रीदायक उपाय आहे.
एखाद्या व्यक्तीने लस घेतली नाही, तर त्याचे काय परिणाम होतील ?
डॉ. राव स्पष्ट करतात की विषाणूमध्ये बदल होऊ शकतो आणि विशेषत: वृद्ध लोक तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासारख्या रोगांमुळे पीडित लोकांमध्ये असंख्य आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. आणि कोविड १९ साठी अजून उपचार पद्धती मिळाली नसल्याने आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्यापेक्षा लस घेणे नक्कीच जास्त सुरक्षित आहे.
आता ज्या रुग्णाला कोविड १९ झाला आहे, तो ही लस घेऊ शकतो का ?
नाही. लसीकरण करण्याआधी कोविड १९ ची लक्षणे आहेत का हे पाहणे महत्त्वाचे आहे. लक्षणे कमी झाली की लस टोचली जाते. समजा कोणाला कोविड १९ झाला असेल तर त्याला लसीकरणासाठी ४ ते ८ आठवडे थांबावे लागेल, नाही तर त्यांच्या आरोग्यामध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
लसीचे किती डोस आवश्यक आहेत ?
दोन समान डोस २८ दिवसांच्या गॅपने घेणे गरजेचे आहे. एकच डोस घेतला तर कोविड १९ च्या विरोधात ६० ते ८० टक्के रोगप्रिकारक शक्ती विकसित होईल. त्यामुळे पूर्ण संरक्षणासाठी दोन डोस घ्यायला हवेतच. दुसरा डोस घ्यायला उशीर झाला तर मात्र त्वरा करावी लागेल.
नियमित घेतले जाणारे औषध आणि लस यांचा परस्परांशी काही संबध येण्याची शक्यता आहे का ?
डॉ. राव सांगतात, कोविड १९ लस आणि नियमित घेतली जाणारी औषधे यांचा परस्पर संबंध येण्याची शक्यता नाही. पण स्टिरोइड्स किंवा तत्सम औषधे घेतली तर कदाचित लस तेवढ्या अँटिबाॅडीज तयार करू शकणार नाहीत.
ज्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी लस घ्यावी का ?
ज्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी लस घेणे टाळावे. अर्थात, ते त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.
गरोदर महिला किंवा स्तनपान देणाऱ्या महिला लस घेऊ शकतात का ?
कोविड १९ लस ही मृत विषाणूंपासून तयार केली आहे. संशोधक सांगतात की त्याचे काही वाईट परिणाम होणार नाहीत. पण हे संशोधन अपुरे असल्याने सीडीसीने सांगितले आहे की गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये. ब्रिटिश आरोग्य संघटनेनेही लसीकरणानंतर किमान दोन महिने गर्भवती न राहण्याची सूचना केली आहे.
मधुमेह आणि लसीकरण?
मधुमेह आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना लवकर लसीकरण करण्याची शिफारस केली जाते. कारण ते ‘ हाय रिस्क ’ वर्गात आहेत आणि त्यांना गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता असते.
मुलांसाठी लसीकरण करावे का ?
अजूनही यावरचे संशोधन निर्णायक स्थितीपर्यंत आलेले नाही. म्हणून १८ वर्षापर्यंतच्या मुलांना लस दिली जाणार नाही.
मी दोन लसींपैकी कुठली हवी त्याची निवड करू शकते का ?
नाही. दोन लसींपैकी पर्याय निवडता येणार नाही. कारण दोन्हीही सारख्याच परिणामकारक आहेत.
लस घेतल्यानंतर ती कधी प्रभावी होईल ?
दुसरा डोस घेतल्यानंतर लस २ आठवड्यात परिणामकारक होईल. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने कोविड १९ होण्याची शक्यता ७० टक्के कमी होईल. रुग्णालयात दाखल होण्यास प्रतिबंध होईल आणि मृत्यूचे प्रमाण कमी होईल.
लसीकरणानंतरही आपल्याला मास्क घालावा लागणार का ?
अजूनही लसीमुळे कोविड १९ पासून १०० टक्के संरक्षण नाही. त्यामुळे संरक्षणासाठी मास्क वापरावा लागेल. हात आणि श्वसन स्वच्छता ठेवावी लागेल. तसेच शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझेशन हे सर्व पाळावे लागेलच. शिवाय लस घेतल्यानंतरचे २ आठवडे खूप महत्त्वाचे आहेत.
लसीचे काही दुष्परिणाम होतात का ?
इतर संसर्गासाठी वापरण्यात येणाऱ्या लसींप्रमाणे ही लस आहे. काही लोकांना थोडा ताप येऊ शकतो. लस टोचलेल्या जागेवर थोड्या वेदना आणि सूजही येऊ शकते. लसींच्या कार्यक्षमतेचे सूचक आहे. पण काही वाईट परिणाम झालेच तर लस जिथे ठेवली आहे, तिथे रासायनिक परिणाम झाले असण्याची शक्यता आहे.
लस किती काळ प्रभावी राहू शकते ?
लसीचा प्रभाव ६ महिने ते २ वर्षांपर्यंत राहू शकतो. पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही निर्णायक समोर आलेले नाही. बुस्टर डोसची गरज आहे की नाही हे आता सांगता येणार नाही.
म्हणूनच, लसीकरणाची मोहीम अनेक देशांमध्ये सुरू झाली असली तरीही अनेक प्रश्नांच्या ठोस उत्तरासाठी संशोधन सुरू आहेच. कोविड १९ लसीकरण अनिवार्य नसले तरी ते खूप महत्त्वाचे आहे.